अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; एक जण ताब्यात
By गणेश वासनिक | Published: November 9, 2023 10:30 PM2023-11-09T22:30:55+5:302023-11-09T22:31:39+5:30
भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई, पुणे सायबर सेलकडून प्राप्त आयडीच्या आधारे केली चौकशी
अमरावती : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स एजन्टकडून संगणकासह विविध नावाच्या आयडी, ई- तिकीट व अन्य साहित्य ताब्यात घेतल्याची कारवाई बुधवारी रेल्वे सुरक्षा बलाने केली. संजय हरिओम अग्रवाल (५४, रा. कॉंग्रेसनगर रोड, सुंदरलाल चौक, टीबी हॉस्पिटलच्या मागे, अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.
भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या माहितीनुसार, पुणे येथील सायबर सेलने रेल्वे तिकिटांच्या आयडी पडताळणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरपीएफच्या चमुने बुधवारी अग्रवाल ट्रॅव्हल ॲन्ड स्टेशनरी या प्रतिष्ठानची तपासणी केली असता अग्रवाल यांनी अधिकृत रेल्वे तिकीट एजन्ट असल्याचे सांगितले. त्यानंतर आरपीएफ चमुने चौकशीदरम्यान डेटामध्ये सापडलेल्या १३ वैयक्तिक वापरकर्ता आयडी व्यतिरिक्त त्यांच्याकडे ८ आयडी आढळून आले. भुसावळ आरपीएफने आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ४७९/ २०२३ रेल्वे कायदा कलम १४३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला भुसावळ रेल्वे न्यायालयात गुरूवारी हजर करण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस.के.वर्मा, उपनिरीक्षक पल्लवी खोडे यांनी केली आहे.
संगणक, ई-तिकिट, मोबाईल जप्त
पासवर्ड आणि संगणकाची तपासताना ४ क्रमांकाच्या थेट ई तिकिटाची किंमत ११७२८ आणि १६ तिकिटांची प्रवास पूर्णता किंमत ३६८६५ काढल्याबद्दल माहिती मिळाली. त्याच्या दुकानातून २२५०० रुपये किमतीचा मोबाईल व २० हजार रुपये किंमतीचा संगणक जप्त करून तपासासाठी ताब्यात घेण्यात आला. आरोपीची चौकशी आणि जबाब नोंदवल्यानंतर प्रबल डेटाकडून मिळालेला एजंट आयडी म्हणजे एकूण २७ ट्रॅव्हल-एंड रेल्वे ई-तिकीटे ३९९५९ रुपये आणि एकूण २१ वैयक्तिक यूजर आयडी मिळून ४३ ट्रॅव्हल-एंड रेल ई-तिकीटे मिळाली. याची किंमत ७६८२४ रूपये होती. या सर्व तिकिटांचे प्रति व्यक्ती ५० रूपये अतिरिक्त तिकीट भाडे लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले.