तोरणवाडी येथील रेशन दुकानदाराकडून काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:50+5:30
तक्रारीनुसार, तोरणवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल विक्रम मोरले यांनी कोरोना संचारबंदीचा फायदा घेत आदिवासींकडून धान्याच्या नावाखाली प्रतिव्यक्ती दोनशे रुपयांची अवैध वसुली केली, तर दरमहा रेशन कार्डवर धान्य देताना गहू आणि तांदूळ प्रत्येकी एक किलो कमी देत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील तोरणवाडी येथे रेशन धान्य दुकानदाराकडून गोरगरीब आदिवासींची लूट केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबत आमदार राजकुमार पटेल यांच्याकडेही त्यांनी कैफीयत मांडली. रेशनचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, तोरणवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल विक्रम मोरले यांनी कोरोना संचारबंदीचा फायदा घेत आदिवासींकडून धान्याच्या नावाखाली प्रतिव्यक्ती दोनशे रुपयांची अवैध वसुली केली, तर दरमहा रेशन कार्डवर धान्य देताना गहू आणि तांदूळ प्रत्येकी एक किलो कमी देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू असल्याची तक्रार गणेश तोटा, पंजाब मोरकर, रविशंकर कास्देकर, पप्पू काकडे, रणजित चव्हाण, नारायण तोटा यांच्यासह अन्य गावकऱ्यांनी चिखलदराच्या तहसीलदार माया माने तसेच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे केली. या तक्रारीनंतर तहसील स्तरावरील चमू तोरणवाडी येथील रेशन दुकानाचा पंचनामा करण्यासाठी दाखल झाली. या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष आहे.
तोरणवाडी येथील ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली आहे. चिखलदरा तालुक्यात आदिवासींना मोफत धान्य वितरित केले जात आहे. त्यासाठी रक्कम न घेण्याचे आदेश रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत.
- माया माने, तहसीलदार, चिखलदरा
तालुक्यात मोफत धान्य वाटप योजनेला सुरुवात
चिखलदरा तालुक्यात मोफत धान्यवाटप योजनेला सुरुवात झाली आहे. तालुक्यात १५३ रेशन दुकानदार आहे. सेमाडोह, चुरणी, राहू, शहापूर, गौलखेडा बाजार अशी पाच शासकीय गोदामे आहेत. एकूण लाभार्थी संख्या १ लाख १६ हजार असून, त्यामध्ये अंत्योदय योजनेतील १९ हजार, तर दारिद्र्यरेषेखालील ६,५०० कार्डधारक आहेत. तालुक्यात मोफत पाच हजार क्विंटल तांदूळ वाटपास सुरुवात झाली आहे.