सरकारी धान्याचा काळाबाजार; तांदूळ तस्करीचे धागेदोरे परतवाडा अकोटपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 03:40 PM2022-11-17T15:40:07+5:302022-11-17T15:48:01+5:30

गोंदिया, भंडारा, चंद्रपूरला जातो माल; अमरावती मार्गावरील एमआयडीसी परिसरात गोदाम?

black marketing of food grains; govt rice smuggling threads from paratwada to akot | सरकारी धान्याचा काळाबाजार; तांदूळ तस्करीचे धागेदोरे परतवाडा अकोटपर्यंत

सरकारी धान्याचा काळाबाजार; तांदूळ तस्करीचे धागेदोरे परतवाडा अकोटपर्यंत

Next

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : अकोट (जि. अकोला) येथून तांदूळ तस्करांचे धागेदोरे परतवाडा शहरातील पिनू नामक तांदूळ तस्कराशी जोडले असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे. यात मोठ्या प्रमाणात आता वसुली होत असल्याने कारवाई नगण्य आहे. शासकीय तांदूळ मोठ्या प्रमाणात खासगीत विकला जात असल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उघड होत असताना हे ‘कनेक्शन’ चर्चेत आले आहे.

रेशन व शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदळाची खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या घटना जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाहनाच्या अपघातात मंगळवारी सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या वाहनातून तांदूळ गोंदिया येथून आणलेले व खराब निघालेले तांदूळ परत करण्यासाठी नेले जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात करणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली.

तस्करांचे जाळे दूरपर्यंत

शालेय पोषण आहारात मोफत व रेशन दुकानातून पाच रुपये किलो दराने तांदूळ वाटप होतो. लाभार्थीकडे शिल्लक राहिलेल्या तांदळाची खेडा खरेदी तस्कर करतात. अकोट परिसरातून हा तांदूळ परतवाडा शहरात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

परतवाड्याचा पिन्नू चर्चेत !

तस्करीचा तांदूळ तब्बल दहाचाकी ट्रकद्वारे गोंदिया, चंद्रपूर परिसरात पाठविला जात असल्याचे परतवाडा व गुन्हे शाखेच्या पथकाच्या मागील काही कारवायांमध्ये पुढे आले होते. शहरातील एक सिंघानिया नामक धान्य तस्कर मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी करून त्याची विल्हेवाट दूरपर्यंत लावत असल्याचे पोलिसांच्या मागील काही कारवाईत पुढे आले होते, हे विशेष. अमरावती मार्गावरील एका एमआयडीसी परिसरात धान्य तस्करीचे गोदाम असल्याची चर्चा बरेच दिवसांपासून आहे. अकोटवरून येणारा चोरीचा तांदूळ रासेगावमार्गे भगवती मातेच्या आशीर्वादाने तेथे जात असल्याचे खात्रीने सांगितले.

धान्य तस्करीचा अड्डा...

शासकीय धान्य असल्याने सर्वप्रथम जबाबदारी महसूलच्या पुरवठा विभागाची आहे. अपघातात वाहनातील तांदूळ उघड झाला असला तरी मोठ्या प्रमाणात परतवाडा धान्य तस्करीचा अड्डा असल्याचे आतापर्यंतच्या कारवायातून पुढे आले आहे, हे विशेष.

धान्य साठा आढळून आल्याप्रकरणी पाच ते सहा कारवाया करण्यात आल्या आहेत. परंतु, लाभार्थींनी ते धान्य विकल्यावर कुठल्याच प्रकारे कारवाईचे निर्देश नाहीत. योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.

- शैलेश देशमुख, पुरवठा निरीक्षक, अचलपूर

Web Title: black marketing of food grains; govt rice smuggling threads from paratwada to akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.