मेळघाटातील अंधश्रद्धा : फूल गिर गया, अब गाव मे शेर आयेगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 10:45 AM2018-12-26T10:45:47+5:302018-12-26T10:49:25+5:30
मेळघाटातील अंधश्रद्धा : जखमेवर अळी पडल्याने चूल बंद, गाव दिवसभर उपाशी
श्यामकांत पाण्डेय
धारणी (अमरावती) : मेळघाटातील गावखेड्यात एखाद्या व्यक्तीला झालेल्या जखमेवर अळी पडल्यास, त्याला ‘फूल गिर गया, अब गाव में शेर आयेगा’ अशी अंधश्रद्धा आजही जोपासली जात आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी चाकर्दा येथे आला. धारणी तालुक्यातील चाकर्दा येथे गावातील एका वृद्धाच्या पायाला दुचाकीच्या सायलेन्सरचा चटका लागला होता. त्याला मधुमेह असल्याने त्याची जखम भरून निघत नव्हती.
दरम्यानच्या काळात त्याच्या जखमेवर अळी पडली. ‘फूल गीर गया...’ ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी स्वयंपाक करणे बंद केले. परिणामी संपूर्ण गाव मंगळवारी सकाळपासून उपाशी होता. या सर्व प्रकारावर उपाय म्हणून गावातील परिहार (पुजारी) त्या व्यक्तीला गावाबाहेरील सिपना नदीच्या काठावर घेऊन गेला. तेथे त्याच्यावर परंपरेनुसार पूजा व उपचार करण्यात आले. त्या व्यक्तीच्या जखमेवर उपचार करून अळ्या बाहेर काढण्यात आल्या व नदीच्या काठावर कोपऱ्यामध्ये खड्डा खणून त्यामध्ये त्या व्यक्तीला बसवण्यात आले. परिहार त्याच्यावर मंत्रोच्चार करून उपचार करीत होता. अखेर त्या व्यक्तीला बसविण्यात आलेल्या जागी अग्नी प्रज्वलित करण्यात आला. ‘भागो रे भागो, तेरा घर जल रहा’ असे बोलताच ती व्यक्ती बाहेर पडली आणि पाहता पाहता त्याच्यावर उपचार झाल्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतरच गावामध्ये स्वयंपाक करण्यात आला.
गावकऱ्यांचा अजब तर्क
या घटनेबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने गावातील वयोवृद्धांना विचारणा केली असता, अशा प्रकारचे जखमेवरची अळी झालेल्या व्यक्तींचा गाव परिहारद्वारे उपचार न केल्यास गावात वाघ येतो व गावाला त्रास देतो, अशी आख्यायिका असल्याचे समोर आले.