विधिमंडळात भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:18 PM2018-07-10T22:18:19+5:302018-07-10T22:18:58+5:30
माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या निधनानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या निधनानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
विधानसभा सभागृहात भय्यासाहेबांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार, सभागृहातील शेकापचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख, शिवसेना नेते व सा. बां. मंत्री एकनाथ शिंदे, आ. वीरेंद्र जगताप या नेत्यांनी भय्यासाहेबांप्रती भावना सभागृहात मांडल्या.
यामध्ये भय्यासाहेबांचा राजकीय जीवनाची सुरूवात, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर घडलेले त्यांचे कार्यकर्तृत्व, रामचंद्र युवक कल्याण संस्थाच्या माध्यमातून कबड्डी व क्रिकेट खेळाला प्राधान्य, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांची संघटन बांधणी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू, पक्षनिष्ठ, विकासाची दूरदृष्टी व मतदारसंघात त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, साधी राहणी, स्व. राज्यपाल प्रभाताई राव यांच्या काळातील पक्ष बांधणी, तिवसा मतदारसंघातील रस्त्याचे जाळे, विकास आदीबाबत त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. काँग्रेस पक्ष, युवक काँग्रेस व तिवसा मतदारसंघात विकास कामे याबाबत त्यांनी दिलेले योगदान हे अमूल्य असल्याचे मान्यवर मंडळींनी सभागृहात आपल्या शोक प्रस्तावात म्हटले. यावेळी ठाकूर कुटूंब, आ. यशोमती ठाकूर यांचे सांत्वन सुद्धा करण्यात आले.