अचलपूरच्या परकोट, दरवाजे, हौज कटोऱ्यावर केंद्र शासनाची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:10 PM2018-05-15T22:10:55+5:302018-05-15T22:10:55+5:30

अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.

Blinds of the Central Government on the walls of the Achalpur, the doors and the hawk curtains | अचलपूरच्या परकोट, दरवाजे, हौज कटोऱ्यावर केंद्र शासनाची मोहोर

अचलपूरच्या परकोट, दरवाजे, हौज कटोऱ्यावर केंद्र शासनाची मोहोर

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा : इजा पोहोचवल्यास दोन वर्षे कैद

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर शहरातील परकोट, दरवाजे व हौज कटोऱ्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाची मोहोर लागली आहे.
ऐतिहासिक व प्राचीन वस्तूंना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. शहरातील परकोटसह दुल्हा गेट, हिरापुरा गेट, जीवनपुरा गेट आणि हौज कटोरा या वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या वास्तूंचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविली आहे. त्यांची हानी, स्वरूपात बदल, विद्रुपीकरण वा दुरुपयोग याकरिता दोन वर्षे कारावास किंवा एक लाखाचा दंड अथवा दोन्ही शिक्षांना सामोरे जावे लागणार आहे.
अचलपूरच्या या पाचही वास्तूंवर लक्ष ठेवण्याकरिता पाच स्वतंत्र चौकीदारांची नियुक्ती पुरातत्त्व विभागाने केली आहे. देशपातळीवरील ऐतिहासिक स्थळांप्रमाणेच येथील स्थळांची विकासकामे पूर्णत्वास नेली जात आहेत. सिलीगुडी येथील पेव इनफ्रास्ट्रक्चर ही कंपनी अकोला, नागपूर, दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही कामे पूर्णत्वास नेत आहे. याकरिता लागणारा खास दगड सिलीगुडीची ही कंपनीच पुरवित आहे. ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या जुन्या दगडांशीच मिळताजुळता हा दगड आहे.
शहराच्या चहुबाजूने असलेल्या परकोटाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यास अतिक्रमणाने ग्रासले आहे. केवळ ५ ते ६ किलोमीटर लांबीचाच परकोट शिल्लक आहे. हौज कटोरा नामक अष्टकोणी वास्तूची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. परकोटला दोन्ही बाजूने आणि हौज कटोरालगत आवारभिंत मजबूत अशा लोखंडी रेलिंगसह उभारण्यात आली. ‘आपण नवाब इस्माईलखानचे तट आणि दरवाजे ह्या संरक्षित स्मारकाच्या २०० मीटर विनियमित सीमेत आहात’ याची जाणीव तेथील फलक करून देत आहेत. सीमेची जाणीव करून देणारा वेगळा फलक हौजकटोरा येथेही लावण्यात आला आहे. पडझड झालेल्या वास्तूंची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने पुरातत्त्व विभाग करणार आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाचे लागले फलक
संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेपासून २०० मीटर पर्यंतचा भाग विनियमित क्षेत्र म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात बांधकाम व तत्संबंधी कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे फलक त्या त्या ठिकाणी पहिल्यांदाच लावण्यात आले आहेत. या वास्तूलगतच्या परिसरात पर्यटकांकरिता पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह व अन्य आवश्यक बाबी पूर्णत्वास नेण्यास भारत सरकारने विभागाला सुचविले आहे.

Web Title: Blinds of the Central Government on the walls of the Achalpur, the doors and the hawk curtains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.