वरूड येथील रक्तदान शिबिरात १०२ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:49+5:302021-07-14T04:16:49+5:30
फोटो - नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, डॉ. आंडे हॉस्पिटल आणि सहयोगी संस्थांचे आयोजन वरूड : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे ...
फोटो -
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, डॉ. आंडे हॉस्पिटल आणि सहयोगी संस्थांचे आयोजन
वरूड : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने वरूड येथे ‘लोकमत रक्ताचं नातं’ अभियान राबविण्यात आले. स्थानिक डॉ. आंडे हॉस्पिटल आणि सहयोगी संस्थाच्या सहकार्याने रविवारी रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक भान जपले.
शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, जाहिरात व्यवस्थापक राजेश मालधुरे, वितरण व्यवस्थापक रवींद्र खांडे, वितरण अधिकारी संजय गुल्हाने, डॉ. मनोहर आंडे, जायंट्सचे अध्यक्ष विवेक बुरे, भाजपचे युवा नेते युवराज आंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल होले, प्रा. किशोर तडस, दिलीप टाकरखेडे उपस्थित होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांना आयोजकांकडून भिंतीवरचे घड्याळ भेट देण्यात आले. रक्त संकलनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीने सहकार्य केले. या शिबिराकरिता डॉ. आंडे हॉस्पिटल, ॲकॉर्ड फाऊंडेशन, जायंट्स ग्रुप, क्रांती युवा ग्रुप, दि ग्रेट मराठा फाऊंडेशन, क्रांतिसूर्य बहुद्देशीय संस्था, संकल्प युवा मित्र, सहजीवन सोशल क्लब, रक्तदाता संघ, सत्यशोधक फाऊंडेशन, वरूड युवा व्यापारी संघटना, चुडामणी नदी मित्र परिवार, महिला विकास मंच, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, श्रद्धा शिक्षण संस्था, वरुड तालुका सुवर्णकार संघटना, साई चैतन्य ॲकेडमी, उत्क्रांती परिवार, विदर्भ ब्रिगेड आदी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला.
लोकमतने अभियानाद्वारे राबविलेल्या रक्तदान शिबिराला सहकार्य करून या महायज्ञात सहभागी झाल्याबद्दल रक्तदात्यांचे सत्यशोधक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर आंडे यांनी आभार मानले. युवकांनी रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावल्यामुळे अनेकांना जीवदान मिळेल, असे उद्गार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा रक्तदाता संघाचे संस्थापक डॉ. प्रमोद पोतदार यांनी काढले.
शिबिराकरिता लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खासबागे, लोकमत समाचारचे तालुका प्रतिनिधी प्रकाश गडवे, डॉ. आंडे हॉस्पिटल आदी सामाजिक संस्था, संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.