रक्तदान हे मानवतेचे मोठे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:48+5:302021-07-05T04:09:48+5:30
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. मात्र, रक्ताची फॅक्टरी कुठे उभारले ...
धामणगाव रेल्वे :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. मात्र, रक्ताची फॅक्टरी कुठे उभारले असे ऐकिवात नाही. आज मानवाने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केली. परंतु, रक्ताचा शोध लागलेला नाही वा त्याचा झटपट पुरवठा करणारे यंत्र मिळालेले नाही. रक्त हे केवळ मानवाच्या शरीरात नैसर्गिक पद्धतीने निर्माण होणारी प्रक्रिया आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, मानवी जीवन वाचविणारे तसेच मानवी नाते अतूट करणारे पुण्याचे कार्य आहे, असे प्रतिपादन जवाहर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजय उगले यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त जवाहर सहकारी सूतगिरणीच्या सहकार्याने येथील गिरधारीलाल द्वारकादास पसारी धर्मशाळेत ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजय उगले होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमत अमरावती युनिटचे संपादकीय प्रमुख गजानन चोपडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, तहसीलदार गौरवकुमार भळगाठिया, जिल्हा परिषद सदस्य अनिता मेश्राम, पंचायत समिती सभापती महादेव समोसे, उपसभापती माधुरी दुधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाध्यक्ष विनोद तलवारे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोहन सिंघवी, एसबीआय कृषी शाखेचे व्यवस्थापक विनायक कुराडे, ग्राम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना हेडवे, शिवसेनेचे मनोज कडू यांची मंचावर उपस्थिती होती.
------
रक्तदानाला सरसावली युवा पिढी
धामणगाव शहर हे विद्यानगरी तसेच अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. आता या शहराने ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमातून ‘रक्तदात्यांची नगरी’ अशी ओळख निर्माण केली. तब्बल १०१ जणांनी महाविक्रमी रक्तदान या शिबिरात केले. सकाळी १० पासून रक्तदात्यांची रीघ लागली, ती दुपारी २ वाजेपर्यंत कायम होती. सर्वाधिक जवाहर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांनी रक्तदान केले. यात सर्वोदय गणेश मंडळाचे कार्यकर्ते तथा माजी सैनिक हरिदास वैद्य यांनी २६ व्या वेळी रक्तदान केले. वकील संघाचे सागर रहाटे, सुरेंद्र ठोंबरे यांनी आठव्यांदा रक्तदान केले, तर संत लहरीबाबा गणेश मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेळके यांनी यावेळी दहाव्यांदा रक्तदान केले. रक्तदान समितीचे तालुकाध्यक्ष चेतन कोठारी यांची मुलगी लेखा चेतन कोठारी, १८ वर्षावरील अनिकेत विघ्ने, श्रीकांत लाहबर, प्रेम पुरोहित यांनी या शिबिरातूनपहिल्यांदा रक्तदान केले. हिंगणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मोहन देशमुख व त्यांचा मुलगा उत्कर्ष या बाप-लेकांनी एकाच वेळी हे श्रेष्ठ दान केले. पेठेनगर येथील रहिवासी स्वप्निल दिवाकर खंडेजोड या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाने रक्तदान करून वाढदिवस सार्थ केला.
------------------
कोरोनायोद्धा मनोज सरदार, विनायक कुराडे सन्मानित
कोरोनाकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता पॉझिटिव्ह रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करणारे तालुक्यातील जळगाव आर्वी येथील उपकेंद्रातील मनोज सरदार व तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्ज वितरित करणारे एसबीआय कृषी विकास शाखेचे व्यवस्थापक विनायक कुराडे यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. आदर्श शिक्षक दिनेश शर्मा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
-------------------
बाबूजींच्या आठवणींना मिळाला उजाळा
धामणगाव तालुक्याच्या मंगल कलशाचे जनक हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी आहेत. पहिला सिमेंट रस्ता त्यांनी या शहरात निर्माण केला होता. ते उद्योगमंत्री असताना सूतगिरणीची निर्मिती केली. या सूतगिरणीला प्रत्यक्षात दत्ता मेघे व सागर मेघे यांनी वैभव प्राप्त करून दिले. त्या सूतगिरणीत ६५० च्या अधिक लोकांना रोजगार मिळाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व महिलांना यांना रोजगार मिळाला आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे तालुक्यात एमआयडीसी, आयटीआय, धामणगाव तालुक्यात नवीन बसस्थानक हे बाबूजी यांच्यामुळे मिळाले. यवतमाळवरून मुंबईला ये-जा असताना येथील विश्रामगृहात ते थांबत होते त्यावेळी शहरवासीयांच्या समस्या ऐकत असत. जवाहर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजय उगले यांनी रविवारी बाबूजींच्या या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत सखी मंच संयोजक अमोल कडुकार, संचालन ज्योती राऊत, विजय ब्राह्मणे, तर आभार प्रदर्शन मोहन राऊत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अतुल शर्मा, मनोज धोटे यांनी करून दिला.
------------------
‘रक्ताचे तुम्ही दान करा ना, मानव धर्माला तुम्ही जगा ना’
प्रसिद्ध गायक-संगीतकार दिनेश शर्मा यांनी या कार्यक्रमात ‘रक्ताचे तुम्ही दान करा ना, मानव धर्माला जगा ना’ अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून रक्तदात्यांचे प्रोत्साहन वाढविले. कोरोनाकाळात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा होता. आज ‘लोकमत’मुळे राज्याच्या रक्तपेढीत सरप्लस पुरवठा झाला आहे, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
------------
धामणगाव जैन संघटनेचे प्रदीप लुणावत, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन कनोजिया, भाजप शहराध्यक्ष गिरीश भुतडा, गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर, आयएमआयचे सचिव डॉ. अशोक भैया, असित पसारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगेश ठाकरे, मराठी पत्रकार संघाचे मंगेश भुजबळ, जळगाव-आर्वीचे माजी सरपंच धीरज मुडे, धामणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौबे, शिक्षण समितीचे शिक्षक समितीचे अध्यक्ष योगिराज मोहोड, प्रमोद भबुतकर, नगरसेवक विनोद धुवे, पत्रकार राजेश पसारी, सचिन वाकेकर, राजेश चौबे, ॲड. नारायणराव राहाटे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्याक्रमासाठी सचिन रामगावकर,नितीन टाले, राजाभाऊ मनोहरे, मनोज धोटे, लोकमत सखी मंचच्या तालुकाप्रमुख संगीता धोटे, शारदा डुबरे, चेतन कोठारी आदींनी अथक परिश्रम केले.