जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; अमरावतीकरांना रक्तदानाचे आवाहन
By उज्वल भालेकर | Published: December 4, 2024 11:36 AM2024-12-04T11:36:35+5:302024-12-04T11:37:23+5:30
Amravati : रक्तासाठी नातेवाइकांची धावपळ ; दिवाळी, निवडणुकींचा परिणाम
उज्ज्वल भालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील खासगी रक्तपेढीमध्येही सारखीच परिस्थिती असल्याने अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. रक्ताअभावी अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुळीत, तसेच दिवाळीच्या उत्सवामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन मंदावल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. येथे असलेली रक्तपेढीतून इतरही शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच जिल्ह्यातील इतरही खासगी रुग्णालयांत रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना देखील या रक्तपेढीमधूनच रक्त पुरवठा केला जातो. तसेच, एक महिन्यापूर्वीच धारणी उपजिल्हा रुग्णालयातही रक्तपेढी कार्यान्वित झाली आहे. या रक्तपेढी व्यतिरिक्त जिल्ह्यात सहा खासगी रक्तपेढी देखील आहेत, परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक काळात सर्वच राजकीय व सामाजिक संघटना या व्यस्त असल्याने त्याचा परिणाम हा नियमित होणाऱ्या रक्तदान शिबिरावर पडला जिल्ह्यात जवळपास २४ शासकीय, तर १५० च्या जवळपास खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे भरती हजारो रुग्ण भरती असून, बहुतांश रुग्णांना रक्ताची गरज असते.
मंगळवारी असा होता उपलब्ध रक्तसाठा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या निर्देशांनुसार शासकीय, तसेच खासगी रक्तपेढींना उपलब्ध रक्त संकलनाची माहिती ही ऑनलाइन रक्तकोषवर दररोज उपलब्ध बंधनकारक आहे. त्यामुळे ई- मंगळवारी ई-रक्तकोषवर जिल्ह्यातील रक्तपेढीतील उपलब्ध माहितीनुसार इर्विन रक्तपेढीत १३ बॅग, डॉ. सदानंदजी बुर्मा ट्रस्ट रक्तपेढी परतवाडा येथे ० बॅग, संत गाडगेबाबा रक्तपेढी ६ बॅग, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी २ बॅग, श्री बालाजी रक्तपेढीत ० बॅग, राजेंद्र गोडे रक्तपेढी ०, धारणी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे ८ बॅग, तर जय माता दी मेळघाट रक्तपेढी येथे ६ बॅग रक्तसाठा हा दुपारी एक वाजेपर्यंत उपलब्ध होता.
इर्विनमध्ये एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये झालेले रक्तदान
महिना झालेले रक्तदान
एप्रिल ९३१
मे ६५९
जून ७७५
जुलै ६३६
ऑगस्ट ८४५
सप्टेंबर ५३९
ऑक्टोबर ७२०
नोव्हेंबर ७११
"रक्ताची होणारी मागणी आणि उपलब्ध रक्तसाठा यामध्ये तफावत आहे. रक्ताची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करावे. जेणेकरून गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करता येईल."
- डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढी प्रमुख.