'इर्विन'मध्ये रक्ताचा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ
By उज्वल भालेकर | Published: March 22, 2023 06:07 PM2023-03-22T18:07:33+5:302023-03-22T18:08:25+5:30
कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम, रक्तदान करण्याचे आवाहन
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, गरजू रुग्णांनाही रक्त मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत असल्याचे चित्र रुग्णालय परिसरात पाहायला मिळाले. सात दिवस चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम रक्तपेढीवर पडला असून, या दिवसांमध्ये एकही रक्तदान शिबिर झाले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे रक्ताची गरज लक्षात घेता, सामाजिक संघटना तसेच रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान हे उपयोगी ठरते. विज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली असली तरी रक्त हे प्रयोगशाळेत निर्माण होत नाही, यासाठी कोणीतरी रक्तदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे रक्तदानाला श्रेष्ठदानही म्हटल्या जाते. परंतु याच रक्ताचा तुटवडा इर्विन येथील जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढीत निर्माण झाला आहे. संप काळात जिल्ह्यात एकही रक्तदान शिबिर झालेले नसल्याने हा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या रुग्णांना रक्तासाठी खासगी रक्तपेढ्यांमध्ये धाव घेण्याची वेळ आली आहे.
इर्विनमधील रक्तपेढी ही एकमेव शासकीय रक्तपेढी असून या रक्तपेढीला जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, टीबी हॉस्पिटलसह जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांना रक्तपुरवठा करावा लागतो. १२ मार्चला या रक्तपेढीमध्ये शेवटचे रक्तदान शिबिर झाले होते. तेव्हापासून एकही शिबिर नसल्याने सामाजिक संघटनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
माझ्या पतीला कर्करोग झाला असून ते सुपर स्पेशालीिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. डॉक्टरांनी त्यांना रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे इर्विन येथील रक्तपेढीमध्ये बी पॉझिटिव्ह रक्तगट मिळविण्यासाठी आले असता, या ठिकाणी रक्तच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. आम्ही वर्धा जिल्ह्यातून याठिकाणी आलेलो असल्यामुळे रक्तदान करणारा नातेवाईकही सध्या आमच्याकडे नाही.
- पुष्पा देवीदास पाटील, रुग्णाची पत्नी
मागील दहा दिवसांपासून रक्तपेढीमध्ये एकही रक्तदान शिबिर झालेले नाही. त्यामुळे सध्या काही प्रमाणात रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जे रक्त उपलब्ध आहे, ते लवकरच गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जात आहे. तरी सामाजिक संघटना व रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. आशिष वाघमारे, रक्तपेढीप्रमुख, इर्विन