'जयस्तंभ' बघतोय निष्पांपाचा 'रक्तरंजित खेळ'
By admin | Published: April 24, 2016 12:13 AM2016-04-24T00:13:11+5:302016-04-24T00:13:11+5:30
स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे.
अपघाताची मालिका : सर्वपक्षीयांची जयस्तंभ हटविण्याची मागणी
नरेंद्र जावरे परतवाडा
स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. परिणामी 'जयस्तंभ' हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परतवाडा शहरात जयस्तंभ ते बैतुल स्टॉप व बाजार समितीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्या जयस्तंभ चौकापासून या कामाची सुरुवात झाली, तोच एकाकी पडला आहे. परिणामी शहरात जाण्यासाठी असलेला जयस्तंभ वळण रस्ता अरुंद झाला आहे. चौपदरीकरणात रुंद झाला आहे. वाहनचालक जयस्तंभ वळण रस्त्याचा वापर न करता थेट आपली वाहने नेत असल्याने अपघाताची मालिका सरू आहे. जयस्तंभपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अचलपूरचे आ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वाकडे जात आहे.
रक्तरंजित खेळ
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली अशा शुरविरांच्या स्मरनार्थ स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक गावात जयस्तंभ उभारण्यात आले. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेला जयस्तंभ भाग आता अपघाताच्या मालिकेत निष्पाप जीवांचा बळी जाताना बघत आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सर्वांना स्वातंत्र्याने जगता यावे याची आठवण करून देण्यापेक्षा एक, दोन अशा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची गिणती करावी लागत आहे.
जागा प्रस्तावित
रस्ता चौपदीकरणात जयस्तंभ हटवून बाजूच्या छत्रपती पार्क पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. आ.बच्चू कडू यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदसुध्दा केली असून मागील दोन वर्षांपासून निधी उपलब्ध असताना 'जयस्तंभ' च्या जागेबद्दल उप-विभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन स्वातंत्र्याचे प्रतीक जयस्तंभ रस्त्याच्या मधात उभारण्याची मागणी भारतीय बौध्द परिषदेचे महासचिव बी.एस.इंगळे यांनी केली.