धारणीत सर्व १० जागांवर फुलले कमळ
By admin | Published: May 27, 2017 12:04 AM2017-05-27T00:04:00+5:302017-05-27T00:04:00+5:30
स्थानिक पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सर्व दहा जागांवर विजय मिळविला.
पंस निवडणूक : मावळत्या सभापती दोन्ही जागांवर पराभूत
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : स्थानिक पंचायत समिती निवडणुकीत भाजपने सर्व दहा जागांवर विजय मिळविला. माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली गेली. पंचायत समिती सभापती सुनीता पटेल यांनी दोन जागा लढविल्या होत्या. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना पराजयाचे तोंड पहावे लागले. राकाँच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढविली.
दहा जागांसाठी २४ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येथे दहा गटांत एकूण ३२ उमेदवार रिंगणात होते. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी भाजपमध्ये पुन:प्रवेश केल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. यातच त्यांच्या पत्नी सुनीता या राकाँच्या उमेदवार असल्याने तालुक्यांत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र, भाजपने सर्व पक्षांना क्लिन स्विप दिल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
कुटुंगा गटातून सुनीता काडमा मोरले यांनी ४२२ मतांनी विजय मिळविला. त्यांनी काँग्रेसच्या सागरबाई धिकार व शिवसेनेच्या शांती ठाकरे यांचा पराभव केला. हरिसाल येथून रामविलास दहिकर यांनी बाजी मारली. त्यांंनी काँगे्रसचे सोहन कास्देकर यांचा ११२८ मतांनी पराभव केला. दुनी येथून भाजपचे तारासिंग कास्देकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या शालिकराम जांबेकर यांच्यावर ११०९ मतांनी मात केली. दिया येथून बाबूलाल मावस्कर २९६५ मते घेऊन विजयी झालेत. गोंडेवाडी गटातून माधुरी जावरकर विजयी झाल्यात. त्यांना २४९४ मते मिळालीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनीता पटले यांचा पराभव केला. शिरपूरमधून भाजपच्या सुलोचना जांब यांनी कुसुमलता पटेल यांचा पराभव केला. टिटवा मतदारसंघातून राजकुमार पटेल यांचे पूत्र रोहित पटेल निवडून आलेत. त्यांनी रामगोपाल मावस्कर यांचा ९४६ मतांनी पराभव केला. मोगर्दा गटातून जगदीश हेकडे यांनी काँग्रेसचे शंकर पाटील यांचा ४४१ मतांनी पराभव केला. राणीगाव गटातून बिंदिया जावरकर यांनी काँग्रेसच्या रेखा जावरकर यांचा पराभव केला. बिंदिया जावरकर यांना २,८२६ मते मिळाली. सावलीखेडा गणातून जया वसू यांनी शिवसेनेच्या शांता बेठेकर यांचा पराभव केला. येथून निवडणूक लढविणाऱ्या मावळत्या पंस सभापती सुनीता पटेल यांना केवळ ५८५ मते मिळाली.
पटेलांचा ‘राजकुमार’ सभापतिपदी !
धारणी पंचायत समितीच्या विजयाचे शिल्पकार माजी आमदार राजकुमार पटेल मानले जात आहेत. पैकीच्या पैकी जागा निवडून आणल्याने पंचायत समितीच्या सभापतीपदी राजकुमार पटेल यांचे सुपूत्र रोहित यांची निवड होण्याची शक्यता आहे. मावळत्या पंचायत समितीमध्ये राजकुमार पटेल यांच्या पत्नी सुनीता सभापती होत्या.