जारिदा आरएफओच्या वाहनावर लुकलुकतो निळा दिवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:51+5:302021-02-06T04:22:51+5:30
वनविभागात दिव्यांचा खेळ : परतवाडा : मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा अंतर्गत जारिदा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) वाहनावर निळ्या रंगाचा ...
वनविभागात दिव्यांचा खेळ :
परतवाडा : मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग परतवाडा अंतर्गत जारिदा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) वाहनावर निळ्या रंगाचा दिवा मोठ्या दिमाखात लुकलुकत आहे.
एमएच २७ एए ५३३१ क्रमांकाची हे वाहन आपल्या निळ्या लाईटसह गुरुवार ४ फेब्रुवारीला मेळघाट (प्रादेशिक) वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या कार्यालयात दाखल झाले. परतवाड्यातील बाजारपेठेतही फिरली. हत्तीचे दानापाणी ज्या किराणा दुकानातून नेले जातात त्या दुकानासमोरही बराचवेळ वाहन उभे राहले.
ज्या प्रादेशिक वनविभागात ते कार्यरत आहेत. त्या वनविभागाच्या भारतीय वनसेवेतील उपवनसंरक्षकांच्या गाडीवर मात्र दिवा नाही. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, राज्याचे वनमंत्री एवढेच नव्हे तर केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्याही गाडीवर कुठल्याही रंगाचा दिवा नाही. केंद्र शासनाच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या १ मे २०१७ च्या अधिसूचनेनुसार वनविभागातील शासकीय वाहनांवर अंबर दिवा किंवा लाल, निळा दिवा अनुज्ञेय नाही. पण यापूर्वीच्या महाराष्ट्र शासनाच्या ७ नोव्हेंबर २०१६ च्या अधिसुचनेचा आधार घेत वनविभागातील काही अधिकाऱ्यांकडून आजही या दिव्यांचा खेळ सुरू आहे.
यांना अनुज्ञेय कसे?
दरम्यान काहींनी आपल्या गाड्यांवरील हे दिवे काढून ठेवले आहेत. काहींनी झाकले आहेत. काढून ठेवलेले हे दिवे काही आरएफओ कार्यालयात आज पडून आहेत. परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे असे दोन दिवे पडून आहेत. जारिदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या वाहनावरील निळ्या दिव्याचा अपवाद वगळता मेळघाटात कार्यरत बहुतांश आरएफओंच्या गाडीवर आज दिवा नाही. मात्र मेळघाट बाहेरील बुलडाणा, मोताळ्याकडे आजही दिवे बघायला मिळत आहे.
जे मंत्र्यांना अनुज्ञेय नाही. वनविभागासह राजस्व विभागातील अधिकाऱ्यांना अनुज्ञेय नाही ते जारिदा वनपरिक्षेत्रातील आरएफओंना अनुज्ञेय कसे याविषयी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
-------