निळे, भगवे, हिरवे झेंडे... इकडेही अन् तिकडेही! महायुती आणि मविआ दोन्हीकडे सारखेच झेंडे
By गणेश वासनिक | Published: April 6, 2024 09:23 AM2024-04-06T09:23:53+5:302024-04-06T09:24:11+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्या महासंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, दोन्ही बाजूचा समान दुवा ठरल्या आहेत त्या निळ्या-भगव्या पताका.
- गणेश वासनिक
अमरावती - लोकशाहीच्या महासंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, दोन्ही बाजूचा समान दुवा ठरल्या आहेत त्या निळ्या-भगव्या पताका. रॅली, सभा किंवा रोड शो असो, नाहीतर भेटीगाठी... या निळ्या, भगव्या पताका, झेंडे आसमंतात उंचावले जात असून राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले गेल्याचे दिसत आहे.
डोक्यावरील टोपी लक्षवेधी
उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील टोपीसुद्धा मतदारांचे लक्ष वेधत आहे. त्यातही ही टोपी भगवी, निळी असून, विदर्भात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारात उमेदवार सामाजिक समीकरण आपल्या बाजूने जुळवून आणण्यासाठी शक्कल लढवत आहेत.
पक्षीय झेंड्यांऐवजी रंगांचे झेंडे खांद्यावर
विदर्भात तापमान ४२ ते ४४ अंशांवर असून सूर्य आग ओकत आहे, तरीही उमेदवारांना प्रचार करावाच लागत आहे.
महायुती असो वा महाविकास आघाडीचा उमेदवार, त्यांच्या गळ्यात पक्षीय दुपट्ट्यांऐवजी असलेले भगवे, निळे दुपट्टे ठळकपणे दिसून येतात.
उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमा, होर्डिंग्ज, पुतळे लावले आहे.