राज्यात शालेय विद्यार्थ्यांवर ‘ब्ल्यू व्हेल’चे सावट! शाळा स्तरावर सल्लागार समिती : शिक्षण संचालकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 06:11 PM2018-01-18T18:11:45+5:302018-01-18T18:12:03+5:30
‘ब्ल्यू व्हेल’ या मोबाइल गेमपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सल्लागार समिती कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी १५ जानेवारीला हे आदेश पारित केलेत.
- प्रदीप भाकरे
अमरावती - ‘ब्ल्यू व्हेल’ या मोबाइल गेमपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सल्लागार समिती कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी १५ जानेवारीला हे आदेश पारित केलेत. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व शाळा व विद्यालयांना याबाबत सूचना द्याव्यात आणि सल्लागार समिती गठित करून त्याचा अहवाल शिक्षण आयुक्तांना पाठविण्याचे निर्देश म्हमाने यांनी दिले आहेत.
रशियात शेकडो मुलांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ब्ल्यू व्हेल गेमने आॅगस्ट २०१७ मध्ये भारतात शिरकाव केला होता. या गेमच्या नादापायी अंधेरीतील १४ वर्षीय मुलाने इमारतीवरून उडी घेतली होती. त्यात त्याला प्राण गमवावे लागले. यातून या व्हिडीओ गेमची काळीकुट्ट बाजू समाजासमक्ष आली. त्या पार्श्वभूमीवर ब्ल्यू व्हेल या गेमपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी शाळास्तरावर सल्लागार समिती स्थापन करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई विरार शहरप्रमुख गोविंदा गुंजाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी मिलिंद सराफ यांनी शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने या सल्लागार समित्या राज्यभरातील शाळांमध्ये गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’?
आॅनलाइन खेळल्या जाणा-या या गेममध्ये एक मास्टर मिळतो. मास्टर प्लेअरला कठीण टास्क देतो. स्वत:च्या रक्ताने ब्ल्यू व्हेल तयार करणे, शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे या प्रकारचे टास्क दिले जातात. त्यात गुंतत जाणा-यांसाठी शेवटचा टास्क आत्महत्येला प्रवृत्त करणारा असतो. यातून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. जगातल्या अनेक देशात ब्ल्यू व्हेल गेमचा जीवघेणा हैदोस असताना भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती.