महापालिकेच्या शाळेत ‘हाऊसफूल’चा बोर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:10 PM2019-07-03T23:10:14+5:302019-07-03T23:10:38+5:30
खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत्याने विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या तयारीकडे लक्ष देण्यात येत असल्याने ही शाळा पालकांच्या कसोटीवर उतरल्याचे या फलकावरून दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत्याने विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या तयारीकडे लक्ष देण्यात येत असल्याने ही शाळा पालकांच्या कसोटीवर उतरल्याचे या फलकावरून दिसून येते.
महापालिकेच्या शिक्षक विभागातील हिंदी व इंग्रजी माध्यमाची ही सर्वात मोठी शाळा आहे. या शाळेत ८०० विद्यार्थी पटसंख्या आहे. महापालिकेच्या शहरातील अन्य शाळांमध्ये प्रवेशाची वानवा असताना या शाळेची पटसंख्या डोळ्यात अंजन भरणारी आहे. त्यामुळे या शाळेला आदर्श या नात्याने पाहिले जाते. या शाळेची येथवर प्रगती साधण्यात मुख्याध्यापक गोपाल कांबळे विशेष प्रयत्न केले आहे. नावीन्यपूर्ण विविध उपक्रम अन् शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधत दर्जा उंचाविण्यावर भर दिल्यानेच या ठिकाणी सद्यस्थितीत पाचवीनंतरची प्रवेश प्रक्रिया आता बंद झाल्याचे फलक लावण्याची वेळ आली आहे. महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले, स्थायीचे माजी सभापती विवेक कलोती, सुनीता भेले, कल्पना बुरंगे यांचे मार्गदर्शन व उपक्रमात सातत्याने सहभाग राहत असल्याने पालकांनीही विश्वास टाकला आहे. हिंदी माध्यमाची शाळा असल्याने मुस्लीमबहुल भागातील विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे अधिक आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत २ ते ३ तास पायाभूत सराव
अप्रगत विद्यार्थ्यांचा नियमित सराव वर्ग, इतर शाळांतून नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांचे उन्हाळ्याच्या सुटीत दररोज २ ते ३ तास पायाभूत सराव या शाळेत घेतला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी पाठ्यक्रमासोबत मातीकाम, शिल्पकाम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदीद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जातो. यासोबतच टाऊन हॉलमध्ये दरवर्षी होणारे स्रेहसंमेलन व यासाठी पालकांची भरगच्च उपस्थितीमुळे प्रतिसाद लाभत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.