पर्यटनवाढीसाठी छत्री तलावावर बोटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:29 AM2020-12-16T04:29:58+5:302020-12-16T04:29:58+5:30
अमरावती : ब्रिटिशकालीन छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणानंतर आता ‘बीओटी’ तत्त्वावर बोटिंगची सुविधा उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे १० वर्षांच्या ...
अमरावती : ब्रिटिशकालीन छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणानंतर आता ‘बीओटी’ तत्त्वावर बोटिंगची सुविधा उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे १० वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या उत्पन्नात १५.८२ लाखांची भर पडेल. प्रशासनाद्वारे हा प्रस्ताव शुक्रवारी आमसभेसमोेर मान्यतेसाठी ठेवण्यात आला.
साधारणपणे १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या तलावात छत्रीच्या आकाराची इंटेक विहीर खोदून शहराला पाणीपुरवठा केला जायचा. पुढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना कार्यान्वित झाल्यानंतर छत्री तलावावरची योजना बारगळली. तसे पाहता, शहरात वडाळी आणि छत्री असे दोन तलाव आहे. यापैकी छत्री तलावाचा आकार मोठा व भोवतालच्या वृक्षराजीमुळे निसर्गसौंदर्यात तो काकणभर सरस ठरतो. या ठिकाणी सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येथे एकूण सर्व परिस्थिती पाहता, विकासाच्या दृष्टीने अधिक वाव आहे. येथे पर्यटनविकासाच्या दृष्टीने बोटिंगची सुविधा उपलब्ध करणे शक्य आहे. अमरावतीकरांच्या करमणुकीसाठी हा मोठ्या रकमेचा प्रस्ताव महापालिकेच्या स्वनिधीतून उभारणे तसे कठीण काम आहे. मात्र, ‘बीओटी’ तत्त्वावर हा प्रकल्प १० वर्षांकरिता उभारल्यास महापालिकेला किमान १५.८९ लाखांचे उत्पन्न लाभणार आहे. त्यामुळे सध्या छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाकरिता नियुक्त केलेल्या एजन्सीद्वारे तसा प्रस्ताव प्रशासनास दिला व प्रशासनाद्वारे कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवारच्या आमसभेसमोर मान्यतेसाठी ठेवला.
बॉक्स
१० वर्षांत प्रकल्पाची बांधणी, वापर, हस्तांतर
सध्या प्रकल्प ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर प्रकल्पाची उभारणी केल्यास महापालिकेचा एक पैसादेखील निधी खर्च होणार नाही. तसे पाहता सद्यस्थितीत बहुतांश शासकीय व निमशासकीय प्रकल्पांचे काम याच तत्त्वाने होत आहे. त्यामुळे छत्री तलावावर बोटिंगचे काम ‘बीओटी’ तत्त्वावर करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
स्थानिकांना रोजगार
क्षेत्रविकासाच्या दृष्टीने बोटिंग प्रकल्पाची उभारणी केल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल. अशा प्रकारचा प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक मनुष्यबळ व तंत्रज्ञान खासगी विकसकाकडे उपलब्ध असल्याने अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण संकल्पनांचा अंतर्भाव यामध्ये करता येणे शक्य असल्याचे प्रशासनाने सांगितले.