बाळाचा पुरलेला मृतदेह पुन्हा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:23 AM2017-10-14T01:23:19+5:302017-10-14T01:23:30+5:30
हिंदू स्मशानभुमित पुरलेल्या एका शिशुचा मृतदेह बेपत्ता झाल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हिंदू स्मशानभुमित पुरलेल्या एका शिशुचा मृतदेह बेपत्ता झाल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून हिंदू स्मशानभूमि संस्थेच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, जमीन उकरून मृतदेह लंपास करणारे कोण, हे रहस्य उलगडले नसल्याने अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत.
नाशिक येथील एक महिला अमरावतीची माहेरवासिनी असून ती प्रसुतीसाठी भावाकडे आली. प्रसुती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोन दिवस त्या चिमुकलीची प्रकृती चांगली होती. मात्र, अचानक तिसºया दिवशी ती चिमुकली दगावली. कुटुंबीयांनी त्या चिमुकलीचा मृतदेह विधिवत हिंदू स्मशान भुमित पुरला. शुक्रवारी तिसरा दिवस असल्याने संबंधित कुटुंबिय हिंदू स्मशानभुमितील पुरलेल्या जागी गेले असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी ज्या ठिकाणी त्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पुरला होता, ती जागा उकरलेली दिसली. तसेच त्या खड्यातील त्यांच्या चिमुकलीचे पार्थिव आढळून आले नाही. हा प्रकार उघड होताच कुटुंबियांनी संताप व्यक्त करीत ही माहिती तात्काळ राजापेठ पोलिसांना दिली. राजापेठच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व श्वान पथकाद्वारे तपासणी सुरु केली. मात्र, पुरलेला मृतदेह कुणी काढून नेला ,याबाबत पोलिस काहीही सांगू शकले नाहीत किंवा कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू न शकल्याने संबंधित कुटुंबियांनी चीड व्यक्त केली. ते कुटूंब अगतिक झाले होते.