वृद्धेचा मृतदेह नेला तहसील कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:03 PM2018-10-16T22:03:54+5:302018-10-16T22:04:14+5:30
श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळाल्याने वृद्धेला उपचार करून घेता आले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू ओढवला. संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूरहून मूळ गावी नेत असताना मंगळवारी वृद्धेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून तासभर ठिय्या दिला. याप्रसंगी नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळाल्याने वृद्धेला उपचार करून घेता आले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू ओढवला. संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूरहून मूळ गावी नेत असताना मंगळवारी वृद्धेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून तासभर ठिय्या दिला. याप्रसंगी नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी करण्यात आली.
कलावती भगवान चोरपगार (७५, रा. सामदा) असे मृत महिलेचे नाव आहे. जानेवारी महिन्यापासून श्रावण बाळ योजनेचे अनुदान त्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांना स्वत:वर उपचार करून घेता आले नाही. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना मुलीकडे अचलपूर येथे नेण्यात आले. तेथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी तिचे प्रेत अचलपूरहून त्यांचे प्रेत गावी आणत असताना प्रभाकर चोरपगार यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धेचे प्रेत तहसीलदारांच्या दालनात आणले. घोषणाबाजीमुळे एकच खळबळ उडाली. तहसीलदार अमोल कुंभार आंदोलनाची माहिती मिळताच दाखल झाले. सुनील चोरपगार, गोपाल चोरपगार, सतीश धावत, दिनेश चोरपगार आदी नातलगांनी यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अरविंद देशपांडे यांच्या निलंबनाशिवाय प्रेत नेणार नसल्याची भूमिका घेतली व तातडीने कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार अमोल कुंभार निवेदन दिले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनीही गर्दी केली. दालनात प्रेत तासभर होते. दरम्यान, सर्व बाबी तपासून पुढील कार्यवाही करू. अशाप्रकारे दालनात प्रेत ठेवणे उचित नाही. त्यावर अंत्यसंस्कार करावा, अशी विनंती तहसीलदार कुंभार यांनी आंदोलकांना केली.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अरविंद देशपांडे यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. परंतु, निलंबनाचे अधिकार आम्हाला नसल्याचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर म्हणाल्या. मात्र, आंदोलक लेखी पत्र द्या, या मागणीवर ठाम होते. यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या कामात दिरंगाई केल्याने नायब तहसीलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येत असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कलावतीबार्इंच्या खात्यात आतापर्यंत १८०० रुपये जमा झाल्याची माहिती तहसीलदार कुंभार यांनी दिली. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाल्याचे कळते. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी आहे.
श्रावणबाळ योजनेच्या कामात नायब तहसीलदार अरविंद देशपांडे हे दिरंगाई करीत असल्याने लाभार्थींना त्रास होत आहे. या आशयाचे पत्र यापूर्वीच उपजिल्हाधिकाºयांना पाठवले आहे.
- अमोल कुंभार
तहसीलदार, दर्यापूर