मुलीला आणायला गेलेल्या पित्याचा मृतदेहच सापडला
By admin | Published: August 25, 2016 12:16 AM2016-08-25T00:16:28+5:302016-08-25T00:16:28+5:30
२० आॅगस्ट रोजी मुलीला आणावयास गेलेल्या बेपत्ता वडिलांचा शेवटी मृतदेहच हाती आल्याने मोर्शी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांबद्दल रोष : जमाव ठाण्यावर धडकला, मोर्शी पोलिसांची हयगयच कारणीभूत असल्याचा मुलाचा आरोप
मोर्शी : २० आॅगस्ट रोजी मुलीला आणावयास गेलेल्या बेपत्ता वडिलांचा शेवटी मृतदेहच हाती आल्याने मोर्शी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी या संदर्भात शेकडो महिला- पुरुषांचा जमाव पोलीस स्टेशनवर धडकल्याने काही काळाकरिता तणाव निर्माण झाला होता.
स्थानिक मधुसुदननगर येथील रहिवासी दिलीप सोनारे (५०) यांची मुलगी रोशनी हिचा विवाह घाटलाडकी (सांभोरा) येथील भीमराव डांगे या युवकासोबत झाला होता. लग्न झाल्यापासून रोशनी हिचा नेहमीच शारीरिक व मानसिक छळ होत असून पैशाची मागणी होत असल्याची तक्रार तिने तिच्या आई-वडिलांकडे केली होती. शनिवार २० रोजी दुपारी रोशनी हिने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे व आता आपण सासरी राहू इच्छित नसल्याचे तिच्या आई-वडिलांना कळविले. त्यावरुन तिचे वडी दिलीप सोनारे हे सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मुलीला माहेरी आणण्याकरिता तिचे सासरी घाटलाडकी (सांभोरा) येथे रवाना झाले. याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दिलीप यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याचे भ्रमणध्वनी करुन काही अज्ञात लोक मारहाण करीत असल्याचे व जंगलाच्या रस्त्याने घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावरुन ऋषिकेशने काही नातेवाईकांशी संपर्क साधला व वडील हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या नातेवाईकांसमवेत घाटलाकडी (सांभोरा) येथे जावून ताबडतोब आपली बहिण रोशनी हिला मोर्शीला परत आणले. परंतु दिलीपचा शोध लागला नाही. बेपत्ता दिलीपचा शोध घेतला असता मंगळवारी ५.३० ते ६ वाजता दरम्यान दिलीपचा मृतदेह मध्यप्रदेशाच्या हद्दीत असलेल्या हिरादेही परिसरात एका विहिरीत आढळून आला. शनिवार २० रोजी मृताचा मुलगा ऋषिकेश व नातेवाईकांनी मोर्शी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोर्शी पोलिसांनी तक्रार दाखल करुन न घेता घाटलाडकी हे ब्राम्हणवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने तुम्ही तिथे तक्रार दाखल करा, असे सांगितले. मोर्शी पोलिसांनी सदरघटनेची गांभीर्याने दखल घेतली असती तर आज माझे वडील जीवंत असते, असा आरोप मृताचा मुलगा, पत्नी व परिवाराने केला आहे. दिलीपचा मृतदेह सापडताच पोलिसांविरुद्ध तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना अटक करेस्तोवर मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, अशी भूमिका नातलगांनील घेतली. मोर्शी पोलीस स्टेशन परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. मोर्शीचे ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांनी कुटुंबाची समजूत घातली. (शहर प्रतनिधी)