बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह आढळला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:21 AM2019-07-10T01:21:20+5:302019-07-10T01:22:12+5:30
गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
चांदूर बाजार येथील रहिवासी काबरा कुटुंबीयांची सात वर्षीय मुलगी प्रीती ही मतिमंद असल्यामुळे तिला अमरावती येथील आशादीप मतिमंद विद्यालयात शिक्षणासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी काबरा कुटुंबीय कॅम्प रोड स्थित भाड्याच्या घरात सामान व्यवस्थित लावत असताना प्रीती ही घराच्या आवारातून बेपत्ता झाली. या घटनेची तक्रार काबरा कुटुंबीयांनी गाडगेनगर पोलीस
ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री चंदापुरे करीत आहेत. या प्रकरणाच्या तपासात त्यांनी व्हायरलेसद्वारे पोलीस यंत्रणेला माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली होती. शोधपत्रिका काढून प्रीतीची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, रविवारी सकाळी ख्रिस्त कॉलनीतील एका विहिरीत प्रीतीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक विनोद चव्हाण यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने प्रीतीचा मृतदेह बाहेर काढला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात तिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.
बेपत्ता झालेल्या प्रीती काबराचा मृतदेह विहिरीत आढळला. अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
- विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, गाडगेनगर