आमदाराच्या आश्रमशाळेत गादीखाली मृतदेह, तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार; आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 08:53 AM2023-09-02T08:53:57+5:302023-09-02T08:56:48+5:30
शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री ८.३० वाजता शाळेतीलच खोलीत झोपण्यासाठी वापरत असलेल्या गाद्यांखाली मृतदेह आढळून आला.
- नरेंद्र जावरे
चिखलदरा (जि. अमरावती) : कारंजा घाडगे (जि. वर्धा) तालुक्यातील नारा येथील दादाराव केचे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आर्वीचे आमदार दादाराव केचे व शाळा प्रशासनाविरुद्ध अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली.
नागपूर येथे शवविच्छेदनाचे चित्रीकरण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी शिवमवर डोमा (ता. चिखलदरा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या शाळेत आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शिवम सनोज उईके या विद्यार्थ्याचा बुधवारी रात्री ८.३० वाजता शाळेतीलच खोलीत झोपण्यासाठी वापरत असलेल्या गाद्यांखाली मृतदेह आढळून आला. याची माहिती शाळा प्रशासनाने दिलीच नाही.
शिवाय डोक्याला मार असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्रावसुद्धा झाल्याचे त्याच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे. शिवम बुधवारी सकाळी नाश्ता केला तेव्हापासून बेपत्ता होता. रात्री ८.३० वाजता त्याचा मृतदेहच विद्यार्थ्यांना आढळून आला. त्याचा मृत्यू केव्हा झाला, हे वैद्यकीय अहवालात स्पष्ट होईल.
घटना नेमकी काय?
मृतक शिवम इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होता. ३० रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. तो शाळेतील हॉस्टेलच्या गाद्या ठेवतात त्या खोलीत गाद्यांच्या ढिगावर झोपला होता. तो झोपेतच खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.