हत्येनंतर महिलेचा मृतदेह फेकला छत्री तलावात
By admin | Published: May 17, 2017 12:06 AM2017-05-17T00:06:11+5:302017-05-17T00:06:11+5:30
हत्येनंतर दगडाने बांधून मृतदेह छत्री तलावात फेकल्याची घटना सोमवारी उघड झाली.
अनैतिक संबंधातून घटना : पती ताब्यात, भाच्याचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हत्येनंतर दगडाने बांधून मृतदेह छत्री तलावात फेकल्याची घटना सोमवारी उघड झाली. नीता दिलीप इंगोले (२५,रा.फे्रजरपुरा) असे मृताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या घटनेत गुन्हे शाखेने पती दिलीप इंगोलेला ताब्यात घेतले आहे. दिलीपचा भाचा नागपूर येथील रहिवासी आकाशचा शोध पोलीस घेत आहे.
पोलीस सूत्रानुसार, सोमवारी सायंकाळी छत्री तलावाच्या पाण्यात एका सर्पमित्राला मृतदेह तरगंताना आढळला. त्याने ही माहिती राजापेठ पोलिसांना दिली. त्या आधारे एएसआय रवींद्र सर्वटकर व तायवाडे यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. मात्र, रात्रीच्या अंधारात मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलीस तपासणीदरम्यान महिलेचा मृतदेह नग्नावस्थेत होता, तसेच तिचा गळा कापलेला, पाठीवर जखमा व हातावर नीता असे नाव गोंदल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी हरविलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता ११ मे रोजी नीता इंगोले नामक महिला हरविल्याची तक्रार राजापेठ ठाण्यात होती. त्यानुसार पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून मृत महिलेची ओळख पटवून घेतली. महिलेच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अंदाजात महिलेची हत्या करून तिला पाण्यात टाकल्याचे निदर्शनास आले. माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने शोधकार्य सुरू केले. पोलिसांनी सर्वप्रथम पती दिलीप इंगोलेला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नीताचे दिलीपचा भाचा आकाश याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे नीता व दिलीप यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. आकाश हा नागपूर येथे राहत होता. एकदा नीता ही आकाशसोबत पळून गेली होती.
दरम्यान पती-पत्नीच्या वादामुळे निता ही हमालपुरा येथील माहेरी राहायला गेली होती. ११ मे रोजी ती काही साहित्य खरेदीच्या अनुषंगाने घराबाहेर गेली व परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर निताचा सोमवारी सायंकाळी छत्री तलावाच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. दरम्यानच्या काळात ही हत्या झाली आहे. हत्येनंतर मृतदेहाला दगड बांधून तलावात फेकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गुन्हे शाखेचे पथक दिलीप इंगोलेची कसून चौकशी करीत असून लवकरच सुगावा लागण्याची शक्यता आहे.
पोलीस नागपूरला रवाना
हत्येनंतर मृतदेह पाण्यात फेकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम मृत महिलेचा पती दिलीप इंगोलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याचा नागपूर येथील भाचा आकाशचे पत्नीशी अनैतिक सबंध असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक आकाशला ताब्यात घेण्यासाठी नागपूर रवाना झाले आहे.