कृषी महाविद्यालय परिसरात नागपूरच्या महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:56+5:30
चार वर्षीय चिमुकल्याचे बोबडे बोल व अन्य माहितीवरून मृताची ओळख तनुश्री सागर करलुके (३२, रा. रूईखैरी, पोस्टे. बुटीबोरी, जि. नागपूर) अशी पटविण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, तनुश्री ही पतीसोबत वाद झाल्याने दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घराबाहेर पडली होती. बुटीबोरी पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘मिसिंग’ची तक्रारदेखील नोंद आहे. दरम्यान, तिचा मृतदेह आढळल्याची माहिती बुटीबोरी ठाण्याला देण्यात आली असून, तिच्या नातेवाईकांना तसे कळविण्याची सूचना देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूर रोडवरील शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना उघड झाली. तेथे कार्यरत चौकीदाराला मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्या दिशेने जाताना त्याला मागील बाजूने एका ३० ते ३२ वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह दिसून आला, तर अंदाजे १० महिने वयाची चिमुकली आईच्या मृतदेहाला बिलगली होती. तसेच लागलीच चार वर्षे वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला. मुलाच्या सांगण्यावरून त्या दोन्ही चिमुकल्यांची ती आई होती.
चार वर्षीय चिमुकल्याचे बोबडे बोल व अन्य माहितीवरून मृताची ओळख तनुश्री सागर करलुके (३२, रा. रूईखैरी, पोस्टे. बुटीबोरी, जि. नागपूर) अशी पटविण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, तनुश्री ही पतीसोबत वाद झाल्याने दोन्ही चिमुकल्यांना घेऊन घराबाहेर पडली होती. बुटीबोरी पोलीस ठाण्यात त्याबाबत ‘मिसिंग’ची तक्रारदेखील नोंद आहे. दरम्यान, तिचा मृतदेह आढळल्याची माहिती बुटीबोरी ठाण्याला देण्यात आली असून, तिच्या नातेवाईकांना तसे कळविण्याची सूचना देण्यात आली आहे. आईच्या मृतदेहाला बिलगलेल्या चिमुकलीचे नाव केतकी तर, तिच्या चार वर्षीय भावाचे नाव रूद्र असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान याप्रकरणी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी अधीक्षक संजय गडलिंग यांनी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास तक्रार नोंदविली.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
मृत तनुश्री ही नागपूर जिल्ह्यातील असल्याने ती मुलांसमवेत नेमकी अमरावतीत कशी आली, याचा शोध घेतला जात आहे. ती कदाचित ट्रॅव्हल्सने आली असावी. वेलकम पॉइंटवर उतरून ती कृषी महाविद्यालयात गेली असावी, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. कृृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे रंगकाम सुरू असल्याने तेथे सीसीटीव्ही नव्हते. त्या भागातील अन्य सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
चिमुकल्या रूद्रने नेले टेरेसवर
माहिती मिळताच उपायुक्त एम.एम.मकानदार, एसीपी पूनम पाटील व गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथे रूद्रला बोलते केले. तब्बल दोन-तीन तासानंतर त्याने आईचे व स्वत:चे नाव सांगितले. तो पोलिसांना इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. तेथे तनुश्रीची पर्स व खाण्याचे काही साहित्य आढळून आले. तास दोन तास तो टेरेसवर घुटमळला. आई बोलत नाही, एवढेच त्याला कळत होते.
हत्या की, आत्महत्या?
तनुश्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन होईल. दरम्यान ती पतीसोबत वाद झाल्याने घराबाहेर पडल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले आहे. आत्महत्या असेल, तर प्रथमदर्शनी घटनास्थळी तसे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे पोलीस निष्कर्षाप्रत पोहोचलेली नाही.
मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहेे. ती महिला नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूईखैरी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत बुटीबोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येऊ शकेल.
- पूनम पाटील, सहायक पोलीस आयुक्त