बॉडीबिल्डर नावेदच्या हत्येचे गूढ कायम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:12 AM2017-07-25T00:12:35+5:302017-07-25T00:12:35+5:30
बॉडी बिल्डर नावेद इकबाल हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर हत्येची सत्यता बाहेर आली आहे.
घटनेच्या सत्यतेबाबत संभ्रम : काय झाले हत्येच्या दिवशी?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बॉडी बिल्डर नावेद इकबाल हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर हत्येची सत्यता बाहेर आली आहे. जीमच्या वादातून ही हत्या झाल्याची सत्यता बाहेर आली आहे. मात्र, नावेद व रहिमच्या मित्रत्वात दरार निर्माण झाली कशी हा सुध्दा एक संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे या हत्ये मागे कोणाचे क्षडयंत्र तर नाही ना, हे गूढ अद्याप कायम आहे.
माहितीनुसार, घटनेच्या दिवशी असोरिया पेट्रोल पंपासमोरील सिडिंकेट बँकेच्या एटीएमसमोर रहिम व नावेदचा वाद उफाळून आला, नावेद हा रहिमवर भारी पडत होता. नावेदने रहिमचा गळा हाताने आवळून धरला होता. त्यावेळी झिशान व जमिल कुरेशी हे मध्यस्थी करण्यासाठी गेल्याचे झिशाननेच पोलिसांना सांगितले आहे. नावेदचा हात रहिमच्या गळ्यापासून दुर करण्याचे प्रयत्न झिशानने सुरु केले होते. मात्र, नावेदची पकड मजबूत असल्यामुळे तो रहिमला सोडवू शकला नाही. त्यावेळी नावेदने झिशानला दुसऱ्या हाताने ढकलून दुर सारले. तेव्हा संतप्त झिशानने कमरेतील चायना चाकू काढून नावेदच्या हातावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकुचा वार नावेदच्या हातावर न लागता तो थेट नावेदच्या मानेवर बसला. त्यामुळे नावेद गंभीर जखमी झाला, त्याची रहिमची पकड कमजोर पडली आणि रहिम त्याचा हातातून सुटला. आता नावेदला आपल्यावर हल्ला करणार असल्याचे पाहून झिशानने नावेदवर पून्हा वार करणे सुरु करून हत्या करण्यात आली. त्यानंतर झिशानने अमरावतीवरून थेट नागपूर आणि पुलगाव मार्गाने चंद्रपुर आणि तेथून वणी पोहोचला. दरम्यान झिशानचा भाऊ आलीशान त्याला वणीला भेटायला आल्याचे झिशानने पोलिासंना सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी दोन्ही भावाना अटक केली. झिशानच्या पोलिसांना सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी रहीम आणि जमिल कुरेशीशिवाय कोणी नव्हते. नावेदच्या हत्येबाबत शहरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. नावेदची हत्या जीम चालविण्याच्या वादातून झाल्याची सत्यता बाहेर आली आहे. मात्र, यामागे आणखी काही कारण असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
झिशानचा आत्महत्येचा प्रयत्न
रविवारी नागपुरी गेट पोलिसांनी झिशानला राजापेठच्या कोठडीतून नागपुरी गेट ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कक्षातील बेंचवर बसविले होते. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अचानक रडणे सुरू केले आणि मला पश्चाताप होत असून मला जगायचे नाही म्हणून झिशानने बेंचवर जोराने डोके आपटून स्वत:ला जखमी केले. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा झिशानवर नोंदविला आहे. मात्र, घटनेनंतर झिशानला लगेच पश्चाताप झाला नसून तीन दिवस ओलांडल्यानंतर त्याला पश्चाताप कसा झाला, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.
जमील कुरेशी साक्षीदार
नावेद हत्याकांड प्रकरणात जमील कुरेशी प्रत्यक्षदर्शी आहे. त्याच्या जागेवरील जीम हा रहीम चालवित होता. रहिमसोबतच करार संपल्यानंतर तो जीम चालविण्यासाठी जमीलने नावेदला तयार केल्याची चर्चा आहे. मात्र, रहिमला तो जीम सोडायचा नव्हता. याच कारणावरून रहीम व नावेदचा वाद उफाळला. रहीम व नावेद हे दोघेही मित्र होते. घटनेवेळी जमील आणि रहीम असोरिया पेट्रोलपंपासमोरील सिडिकेंट बॅकेसमोर पोहोचले. तेथेच नावेदची हत्या झाली. रहीम व नावेदचा वाद हा जमील कुरेशीच्या जागेवरून सुरु झाला होता.