अंजनगावात बोगस एलईडी दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:02 PM2018-12-25T22:02:02+5:302018-12-25T22:02:24+5:30
शहरात नव्याने लागलेल्या एलईडी दिव्यांखालीच अंधार असून, या न लागणाऱ्या दिव्यांसाठी संबंधित कंपनीकडून पाच लाख रुपयांची वसुली करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पारित करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : शहरात नव्याने लागलेल्या एलईडी दिव्यांखालीच अंधार असून, या न लागणाऱ्या दिव्यांसाठी संबंधित कंपनीकडून पाच लाख रुपयांची वसुली करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पारित करण्यात आला. नगरसेवकांनी प्रशासनाला या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्यासोबत शहरातील अंधार दूर करण्याची मागणी केली.
पीठासीन सभापती तथा नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांच्या पुढाकाराने ई.ई.एस.एल. कंपनीला पाच लाख रूपये दंड वसूल करण्यात यावा, या विषयीचा ठराव मांडण्यात आला होता. सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला. शहरात जवळपास २२०० पथदिवे लावण्याचा करार ईईएसएल कंपनीशी करण्यात आला होता. त्यापैकी ४० टक्केच लागले असून, मोठ्या प्रमाणावर दिवे बंद आहेत.
तत्पूर्वी, ४ जून २०१८ चे शासननिर्णयानुसार अंजनगावात ई.ई.एस.एल. कंपनीमार्फत शहरात एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात झाली होती. ऐन गणेशोत्सव ते दसºयाच्या काळात लागलेले पथदिवे पूर्णपणे बंद अवस्थेत आढळून आले. ऐन उत्सवाच्या काळात शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. शहरवासीयांनी असंतोष व्यक्त केला, तर नगरसेवकांसाठी ही बाब डोकेदुखी ठरली होती. यासंदर्भात नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांकडे तक्रार केली होती. नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे व नगरसेवक मनोहर भावे, मधुकर गुजर, रवींद्र बोडखे, सचिन जायदे, मनोहर मुरकुटे, उत्तम मुरकुटे, भूपेंद्र भेलांडे, नीलेश ईखार, हेमंत माकोडे यांनी शहरातील पथदिव्यांची पाहणी करून ते त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले तसेच तीन वेळा पत्रव्यवहार करूनही कंपनीकडून या समस्येचे कोणतेही निरसन झाले नाही.
ईईएसएल कंपनीमार्फत शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले होते. त्या लावलेल्या दिव्यांबाबत नागरिकांच्या सततच्या तक्रारी व नगरसेवकांच्या तक्रारीमुळे व सदर कंपनीच्या ढिसाळ कारभारबाबत सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन कंपनीवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवित आहे.
- श्रीकृष्ण वाहूरवाघ, मुख्याधिकारी