अमरावती विद्यापीठाचा बोगस कारभार; सात वर्षांत १०० कोटींचा खर्च
By गणेश वासनिक | Published: March 28, 2023 07:00 PM2023-03-28T19:00:01+5:302023-03-28T19:01:02+5:30
Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गत सात वर्षांत जनरल फंडातून तब्बल १०० कोटींचा अनावश्यक खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गत सात वर्षांत जनरल फंडातून तब्बल १०० कोटींचा अनावश्यक खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. अनावश्यक शैक्षणिक विभाग, योजना आणि कार्यक्रमांवर खर्च हा जनरल फंडातून करण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी ‘एफडी’ रकमेच्या व्याजाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
दि. १५ मार्च रोजी झालेल्या सिनेट सभेत जनरल फंडाचे वास्तव पुढे आले.
हल्ली विद्यापीठाचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. गत पाच वर्षांत अधिकाऱ्यांनी नवीन योजना, शैक्षणिक विभाग, तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती, आउंटसोर्सिंगचा बेसुमार खर्च, ऑनलाइन कामांसाठी एजन्सी, परीक्षांचे ऑनलाइन कामांसाठी माईंड लॉजिक, प्रोमार्क या बाह्य यंत्रणेवर खर्च, स्वयंअर्थसाहाय्य योजना अथवा नव्या शैक्षणिक विभागांवर जनरल फंडातूनच खर्च केला जात असल्याची माहिती आहे. दरमहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी कधीकधी जनरल फंडाचा वापर होत केला जातो. ऑगस्ट २०१५ मध्ये जनरल फंडात १०७ कोटी असताना आजमितीला ४८ लाख शिल्लक असल्याचे वास्तव आहे. जनरल फंडात विद्यार्थी शुल्क, व्याज, केंद्रीय प्रवेश शुल्क व अन्य शुल्कातून येणारी रक्कम जमा होते. मात्र, गत सात वर्षांत जनरल फंडातून झालेला खर्च बघता ही उधळपट्टी कशी रोखणार? असा सवाल उपस्थित होत आहे, तर जनरल फंडाची दयनीय अवस्था असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना अधिसभेत सांगावे लागले, हे विशेष.
इतर विद्यापीठाच्या तुलनेत अमरावती विद्यापीठात फार काही निधी जमा नाही. कामकाज चालत आहे. परीक्षा, प्रवेश शुल्क जैसे-थे आहे, यात कोणतीही वाढ केली नाही. उत्पन्न मर्यादित असून, खर्च वाढलेला आहे. आता विद्यापीठाच्या उत्पन्नात वाढ करणे काळाची गरज आहे.
- डॉ. नितीन कोळी, प्रभारी वित्त व लेखाधिकारी, अमरावती
सन २०१५ मध्ये व्यवस्थापन परिषदेवर सदस्य असताना त्यावेळी सामान्य निधीत १०७ कोटींचा निधी शिल्लक असल्याचे विद्यापीठाने प्रमाणित पत्र दिले होते. मात्र, गत ४ त ५ वर्षांत सामान्य निधीची अक्षरश: उधळपट्टी करण्यात आली. १५ मार्च रोजीच्या सिनेट सभेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या निधीची दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार ढिसाळ नियोजनाचा नमुना आहे.
- डॉ. प्रवीण रघुवंशी, सदस्य, व्यवस्थापन परिषद, अमरावती विद्यापीठ.