श्रावणबाळ योजनेत पुन्हा बोगस लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 12:13 AM2016-03-21T00:13:07+5:302016-03-21T00:13:07+5:30
केंद्र व राज्य शासनाने देशातील गरिबांना व वृद्धांना मदतीचा हात मिळावा म्हणून संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘श्रावण बाळ योजना’ सुरू केली.
पात्र लाभार्थ्यांना डावलले : पोहरा गावकऱ्यांची व्यथा, दलालांवर असावा अंकुश
श्यामकांत पाण्डेय धारणी
केंद्र व राज्य शासनाने देशातील गरिबांना व वृद्धांना मदतीचा हात मिळावा म्हणून संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘श्रावण बाळ योजना’ सुरू केली. या योजनेत ६५ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील वृद्धांचा समावेश करण्यात आला. मात्र वयोमर्यादा पूर्ण न करणाऱ्यांची नावे दलालामार्फत पात्रता यादीत समावेश करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
२०१४ मध्ये याच योजनेंतर्गत २५ वर्षांच्या युवकांना लाभ देण्यात आले होते. याची वाच्यता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासमोर हरिसाल या गावातील वृद्धांनी केली होती. त्यावेळी गित्ते यांनी या बोगस लाभार्थ्यांची ओळखपरेड स्वत: करून घेतली. याप्रकरणी दोषी असलेल्या नायब तहसीलदार सोळंके यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन अटकसुद्धा करण्यात आली होती. सध्या ते प्रकरण पोलीस तपासात प्रलंबित आहे.
या प्रकरणामुळे श्रावण बाळ योजना तात्पुरत्या स्वरुपात बंद करून चौकशी प्रारंभ करण्यात आली होती. त्यात हजारो बोगस लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येऊन त्यांचे अनुदान बंद करण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने संपूर्ण आवश्यक कागदपत्रे बोलाविण्यात येऊन नव्याने यादी तयार करण्यात येत आहे. मात्र नवीन यादीतही बोगस लाभार्थींना पात्र करण्यात आल्याचा आरोप पोहरा या गावातील नागरिकांनी केला आहे.
पोहरा येथील सुज्ञ नागरिकांनी पात्र लाभार्थ्यांची जन्मतारीख शाळेच्या रजिस्टरवरून काढून पुराव्यादाखल प्रस्तुत प्रतिनिधीकडे आणून दिली आहे. गावात एकूण ६० च्या जवळपास अपात्र व बोगस लाभार्थी असून पात्र ३५ लाभार्थी या योजनेतून अपात्र केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
याबाबत संजय गांधी नायब तहसीलदार जी. ई. राजगडे यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते सुटीवर असल्याचे कळले. प्रभारी नायब तहसीलदार पी. एम. सिंगाडे यांचेशी संपर्क केल्यावर त्यांनी सर्व प्रकरण आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व वैद्यकीय दाखला यांच्या आधारे तयार करण्यात आल्याचे सांगितले.
धारणी तालुक्यात अनेक पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचा श्रावणबाळ योजनेच्या पात्रता यादीत समावेश करण्याची एकमुखी मागणी होत आहे. समावेश केलेले नावे जन्म तारखेची यादी तपासून तयार करण्यात येईल, असे सांगितले.
अपात्र लाभार्थ्यांची नावे, जन्मतारीख
हिरालाल रामदीन मेटकर (१.७.५१), राजाराम मानू भिलावेकर (७.१२.५३), शंकर चुन्या जांबेकर (३.१.५६), भुरेलाल हिरालाल मावस्कर (८.९.५६), दादू सावरू कास्देकर (१६.७.५७), हिरालाल रामजी पाटणकर (७.६.५९), रामलाल रामदीन मेटकर (१२.४.५९), रामकिसन सानू ठाकरे (२५.५.६०), सखाराम डोकरा ठाकरे (७.८.६०), बाबुलाल पटेल कास्देकर (१.९.६३), दयाराम बाबू कास्देकर (१५.७.६६), नंदकिशोर पटेल कासदेकर (६.९.६८), चंपालाल भाऊ कास्देकर (४.५.६६), बाबुलाल बानु कास्देकर (५.४.६३) आणि भुरेलाल हिरालाल मावस्कर (८.९.५६) असे पोहरा येथील बोगस लाभार्थी आहेत.