बोगस बीटी बियाणे, चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:38 PM2018-06-11T22:38:41+5:302018-06-11T22:39:28+5:30
खरीप हंगाम सुरू होताच जिल्ह्यात राजा, जादूगर नामक कंपनीचे बोगस बी.टी बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याचा भंडाफोड सोमवारी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी केला. मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे बोंडअळी, बुरसीजन्य रोगामुळे कपाशी पिकांच्या नुकसानाचा शेतकऱ्यांना फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरीप हंगाम सुरू होताच जिल्ह्यात राजा, जादूगर नामक कंपनीचे बोगस बी.टी बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याचा भंडाफोड सोमवारी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी केला. मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे बोंडअळी, बुरसीजन्य रोगामुळे कपाशी पिकांच्या नुकसानाचा शेतकऱ्यांना फटका बसला. यंदा तर खरीप हंगाम सुरू होताच जिल्हाभरात शासनाने मान्यता दिलेल्या बी.टी.बियाण्यांशिवाय राजा व जादूगर नावाच्या कंपनीचे जिल्हाभरात १ लाख १३ हजार पाकिटे आले कसे, असा प्रश्न बियाण्यांचे पुरावे देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झेडपी सदस्य देवेंद्र भुयार यांनी जिल्हा परिषदेच्या आमसभेत कृषी अधिकाºयांना केला. खरीप हंगामात बोगस बी- बियाणे व खताचा काळाबाजार रोखण्यासाठी एकीकडे भरारी पथके गठित केल्याचे मोठया अभिमानाने कृषी विभागाचे अधिकारी सांगतात. जिल्ह्यात बोगस बियाणे आले असताना हे बियाणे कृषी विभागाच्या अधिकाºयांना का दिसत नाही. यावरून बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीला या विभागाचे अभय तर नाही ना, असा संशय या प्रकारामुळे बळावल्याचा आरोप भुयार यांनी केला. भुयार यांच्या मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता झेडपी अध्यक्ष यांनी बोगस बी.टी. बियाण्यांच्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आमसभेत एकमताने घेण्यात आला. याला सत्ताधारी व विरोधीपक्षाच्या सदस्यांनीही समर्थन दिले. या चौकशी समितीचे प्रमुख हे स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष असून यामध्ये दोन सदस्य व दोन अधिकारी अशी पाच जणांचा समावेश आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी सभागृहात दिले. यावेळी आरोग्य, शिक्षण, बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा आदी विभागाच्या मुद्यावरही वादळी चर्चा झाली. सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, प्रताप अभ्यंकर, महेंद्रसिंग गैलवार, प्रवीण तायडे, शरद मोहोड, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, राधिका घुईखेकर, प्रकाश साबळे, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अॅडिशनल सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, पतंगराव, प्रशांत थोरात, संजय इंगळे, माया वानखडे, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, प्रमोद तलवारे, संजय येवले, कॅफो रवींद्र येवले, विजय रहाटे व खातेप्रमुख तसेच सदस्य उपस्थित होते.
समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या विरोधात ठराव
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी मीणा अंबाडेकर यांच्या कार्यप्रणालीवर ११ जून रोजी जिल्हा परिषद सदस्यांनी आक्षेप घेतला. सदस्यांनी विचारलेली माहिती समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे गटनेता प्रवीण तायडे, सदस्य शरद मोहोड यांनी सभेत प्रश्न मांडला. दरम्यान सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचा ठराव मांडला व हा प्रस्ताव अध्यक्षांनी मान्य केला.
खड्डे बुजविण्यासाठी ५० हजारांचा निधी
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्कलमध्ये रस्त्याची वाट अधिक बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी प्रत्येक सदस्याला प्रत्येकी २ लाख रूपये रस्ते व खड्डे दुरूस्तीसाठी देण्याची मागणी सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी केली. यावर बबलू देशमुख यांनी याला सहमती दर्शविली. दरम्यान पावसाचे दिवस लक्षात घेता या मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येक सदस्यांना सर्कलमध्ये खड्डे बुजविण्यासाठी ५० हजार रूपये देण्याचा ठराव अध्यक्षांनी मान्य केला.
बोगस बीटी बियाणे बाजारपेठेत आल्याचे पुरावे सदस्यांनी सभागृहात मांडले. याची दखल घेतली. यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. यात जे दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल व याचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.
- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, जिल्हा परिषद