बोगस ‘डीन’प्रकरणी साक्ष नोंदविण्यास प्रारंभ
By admin | Published: February 21, 2017 12:10 AM2017-02-21T00:10:51+5:302017-02-21T00:10:51+5:30
संत गाडगेबाबा विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) मार्कस लाकडे यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी संबंधितांची साक्ष नोंदविण्यास प्रारंभ झाला आहे.
कुलगुरुंची माहिती : कुणाचाही मुुलाहिजा नाही, दोषींवर कारवाई होणारच!
अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) मार्कस लाकडे यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी संबंधितांची साक्ष नोंदविण्यास प्रारंभ झाला आहे. याप्रकरणी कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू, असे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सोमवारी स्पष्ट केली.
विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत सोहळा गुरुवारी होऊ घातला आहे. या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रपरिषदेत कुलगुरुंनी बोगस ‘डीन’ लाकडे प्रकरणी नियुक्तीवेळी स्थायी समितीत समाविष्ट असलेल्यांची साक्ष नोंदविली जाणार असल्याचे सांगितले. हे प्रकरण थोेडे गंभीर स्वरुपाचे आहे. थेट कारवाई करण्यापूर्वी नियम, कायद्याची बाजू तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठातापदी नियुक्तीच्यावेळी लाकडेंनी सादर केलेली कागदपत्रे, प्राचार्यपदाचे पत्र आदी महत्त्वाच्या बाबी तपासल्या जात आहे. याची चौकशी बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूकर यांच्याकडे सोपविली आहे. सर्व बाबीच्या खोलात जाऊन चौकशी जयपूरकर यांनी केली आहे. प्रवास भत्त्यात अनियमितता अथवा गैरप्रकार झाल्या असल्यास ते सुद्धा लवकरच समोर आणले जाईल. लाकडेंच्या बेकायदेशीर ‘डीन’ नियुक्ती प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांची आता खैर नाही, असा आक्रमक पवित्रा उचलला असल्याचे कुलगुरु चांदेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
स्थायी समिती अध्यक्ष, सदस्यांची साक्ष
विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी लाकडे यांची नियुक्ती करतावेळी सन २०१४ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष, सदस्यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. लाकडे यांच्या ‘डीन’ पदी नियुक्तीला कशाचा आधार होता. त्यावेळी स्थायी समितीत कोणते सदस्य होते, त्या सर्वांची साक्ष वजा बयाण नोंदवून ते अहवाल स्वरुपात सादर होणार आहे.