बोगस ‘डीन’प्रकरणी फौजदारीचे संकेत

By admin | Published: January 25, 2017 12:06 AM2017-01-25T00:06:17+5:302017-01-25T00:06:17+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता(डीन) पदी बोगस नियुक्तीप्रकरणी कुलगुरुंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

The bogus 'dean' criminal case sign | बोगस ‘डीन’प्रकरणी फौजदारीचे संकेत

बोगस ‘डीन’प्रकरणी फौजदारीचे संकेत

Next

कुलगुरुंचे आदेश : ‘बीसीयूडी’ संचालकाकडे जबाबदारी
गणेश वासनिक अमरावती
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता(डीन) पदी बोगस नियुक्तीप्रकरणी कुलगुरुंनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘डीन’ एम.एच.लकडे यांच्या नियुक्तीशी जुळलेल्या इतरही बाबींची चौकशी करून ‘बीसीयूडी’ संचालकांकडून अहवाल मागविला आहे.
कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाच्या शिक्षण विद्याशाखेत झालेल्या नियमबाह्य कारभाराच्या सत्यतेच्या तपासणीची जबाबदारी बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर यांच्याकडे सोपविली आहे. शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरु असलेल्या गैरकारभाराचे वास्तव उघडकीस आणल्याबद्दल ‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

आर्थिक व्यवहाराचा संशय
अमरावती : ‘डीन’ पद मिळविण्यासाठी एम.एच.लकडे यांनी गाठलेली पातळी जाणून घेतल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनही अवाक झाले आहे. यवतमाळ येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापकपदी कार्यरत एम.एच.लकडे यांची ‘डीन’ म्हणून विद्यापीठात जुलै २०१४ मध्ये नियुक्ती झाली. तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांनी ‘डीन’ पदाला मान्यता दिली असून खेडकरदेखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. लकडे यांनी ‘डीन’ पद मिळविताना काही आर्थिक व्यवहार केला काय, हेसुद्धा जाणून घेतले जाणार आहे. शिक्षण विद्याशाखा ‘डीन’ पदी वर्णी लावताना लकडे यांनी दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ते प्राचार्यपदी कार्यरत असल्याचे संस्थाचालकांचे पत्र विद्यापीठाला सादर केले होेते. त्यामुळे संस्था चालकांनी दिलेले पत्र खरे की खोटे, हे देखील आता चौक शीअंती स्पष्ट होणार आहे. विद्यमान कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी ही चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व्हावी, अशा सूचना बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर यांना दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. कायदे, नियम गुंडाळून ‘डीन’पदी लकडे यांना नियुक्ती देताना कोणाचा सहभाग होता, या खोलात शिरले जाणार आहे. लकडे यांनी संस्थाचालकांचे प्राचार्यपदी कार्यरत असल्याचे पत्र बनावट आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्याचे संकेत विद्यापीठातून वर्तविले जात आहेत. तत्कालीन कुलगुरु मोहन खेडकर यांच्या अफलातून कारभारामुळे यापूर्वी विद्यापीठाची नामुष्की झाली असताना आता बोगस ‘डीन’चे प्रकरण हीदेखील त्यांचीच लीला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)

राज्यपालांकडे ‘डीन’ यांची तक्रार
विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेच्या ‘डीन’पदी एम.एच.लकडे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नियमबाह्य मार्गाने नियुक्ती मिळविल्याप्रकरणी राज्यपाल व्ही.विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. एम.एच. लकडे यांच्या ‘डीन’ पदी नियुक्तीची चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे निर्देश कुलगुरु चांदेकर यांना राज्यपाल कार्यालयातून मिळाले आहे. मात्र, एम.एच.लकडे यांना अभय कोणी दिले,हा संशोधनाचा विषय आहे.

शिक्षण विद्याशाखा अधिष्ठातापदी एम.एच. लकडे यांच्या नियुक्तीप्रकरणाची चौकशी होणार असून हे पद नियमबाह्य असल्यास कारवाई होईल. चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. राज्यपालांनीही चौकशीचे पत्र दिले आहे.
-मुरलीधर चांदेकर, कुलगुरू

लकडे यांनी विद्यापीठात ‘डीन’ पदी कार्यरत असताना अनेक नियमबाह्य कामे केली आहेत. याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली असून चौकशी सुद्धा सुरु झाली आहे. आर्थिक व्यवहाराची चौकशी होणे अपेक्षित आहे.
- अजय गुल्हाने,
तक्रारकर्ते, अमरावती.

Web Title: The bogus 'dean' criminal case sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.