बोगस आठ; ‘ऑन दी स्पॉट’ झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 05:00 AM2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:01:03+5:30

‘खुल्या शासकीय भूखंडावर चढविले बोगस मालकाचे नाव’ या वृत्तातून ‘लोकमत’ने हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अमरावती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गुरुवारी कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. तेथे त्या ग्रामपंचायतमधून अळणगाव पुनर्वसितांना देण्यात आलेल्या व एकूणच तयार करण्यात आलेल्या नमुना आठची तपासणी करण्यात आली.

Bogus eight; ‘On the spot’ bushes | बोगस आठ; ‘ऑन दी स्पॉट’ झाडाझडती

बोगस आठ; ‘ऑन दी स्पॉट’ झाडाझडती

Next

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय भूखंड विकण्यासाठी कठोरा ग्रामपंचायतच्या सही शिक्क्यानिशी देण्यात आलेल्या बनावट नमुना आठप्रकरणी प्रशासनाचा हत्ती जोरदार हलला. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांसह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गुरुवारी कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. तेथे ग्रामसेवकांकडून देण्यात आलेल्या सर्व नमुना आठची तपासणी केली. तथा अळणगाव पुनर्वसन गावात जाऊन तेथे रिक्त भूखंडाचीदेखील पाहणी केली. विशेष म्हणजे कठोरा ग्रामपंचायत कार्यालयातील ही चौकशी ‘कुलूपबंद’ करण्यात आली. विद्यमान ग्रामसेवकाकडून संपूर्ण माहिती घेण्यात आली.
‘खुल्या शासकीय भूखंडावर चढविले बोगस मालकाचे नाव’ या वृत्तातून ‘लोकमत’ने हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अमरावती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गुरुवारी कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. तेथे त्या ग्रामपंचायतमधून अळणगाव पुनर्वसितांना देण्यात आलेल्या व एकूणच तयार करण्यात आलेल्या नमुना आठची तपासणी करण्यात आली. ज्या बोगस आठ वर अळणगाव पुनर्वसनातील रिक्त भूखंडाची विक्री होणार होती, ज्यावर मालक म्हणून अन्य व्यक्तीचे नाव चढविण्यात आले आहे, त्या ८ अ वरील स्वाक्षरी व शिक्क्याची शहानिशा करण्यात आली. ते त्यांचा प्राथमिक चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.

आर्थिक फसवणूक 
कठोरा रेवसा मार्गस्थित निम्न पेढी प्रकल्पग्रस्तांच्या अळणगाव  पुनर्वसित गावातील शासकीय भूखंड विक्रीसाठी बोगस आठ देण्यात आला. मात्र तो बनावट असल्याचे लक्षात येताच अल्प किमतीत होणारा विक्री व्यवहार थांबला. मात्र, याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास कठोरा ग्रामपंचायतकडून अळणगाव पुनर्वसितांना आतापर्यंत किती नमुना आठ देण्यात आले, ते उघड होणार आहे. 

पंचायत समिती करणार चौकशी 
या संपूर्ण बनावट आठ अ प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी अमरावती पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. याबाबत चौकशी समितीदेखील गठित करण्यात येणार आहे. संबंधित ग्रामसेवकाची चौकशी केल्यास नमुना आठ नेमका कुणी दिला, त्यावर बोगस नाव कुणी चढविले, स्वाक्षरी कुणाची, शिक्का मारला कुणी, याचा उलगडा होणार आहे. 

नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार 
याबाबत अमित चाळके यांनी नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, तेथील ठाणेदार साधी पोचही द्यायला टाळाटाळ करत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. बनावट आठ अ देऊन संबंधित ग्रामसेवकाने ग्रामरोजगार सेवकाला हाताशी धरून आपली आर्थिक फसवणूक केली, त्या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत नमूद आहे. 

गुरूवारी विस्तार अधिकाऱ्यांनी कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन संपूर्ण नमुना आठची तपासणी करण्यात आली. याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. गैरप्रकार वा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. विजय राहाटे,
बीडीओ, अमरावती

कठोरा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अभिलेखाची पाहणी केली. त्यात छेडखानी झालेली नाही. त्यामुळे आमच्या कार्यालयीन नोंदीनुसार त्या रिक्त भूखंडावर खासगी व्यक्तीचे नाव कुणी चढविले, तो पोलीस तपासाचा भाग आहे.
- राम लंके,
जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अमरावती

 

Web Title: Bogus eight; ‘On the spot’ bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.