‘त्या’ लिपिकाकडून होणार बोगस पीआर कार्ड प्रकरणाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:33+5:302021-07-02T04:10:33+5:30
अमरावती : कॅम्प या उच्चभ्रू वस्तीतील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडाचे येथील भूमिअभिलेख कार्यालयात बोगस पीआर कार्ड तयार करण्यात आले. ...
अमरावती : कॅम्प या उच्चभ्रू वस्तीतील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडाचे येथील भूमिअभिलेख कार्यालयात बोगस पीआर कार्ड तयार करण्यात आले. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भूमिअभिलेख विभागाच्या एका कनिष्ठ लिपिकाला ३० जूनला अटक केली. २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या त्या लिपिकाकडून बोगस पीआर कार्ड प्रकरणात मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्वप्निल देवराव उंबरकर (२९, रा. प्रशांतनगर, अमरावती) असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
उंबरकरला या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराकडून भूखंड विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पाच लाख रुपयांचे आश्वासन मिळाले होते. त्या आश्वासनाला भुलून त्याने बोगस पीआर कार्ड तयार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्याने याशिवाय आणखी काही बोगस पीआर कार्ड बनविले का, या दिशेने तपास करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणात सात दिवसांपूर्वी मुख्य सूत्रधार संदीप राठी आणि भूखंडाचा नकली मालक प्रकाश विठोबा ठाकरे या दोघांना अटक केली. संदीप राठीची चौकशी केली असता, त्याने भूमिअभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक स्वप्निल उंबरकरच्या माध्यमातूनच हे बनावट पीआर कार्ड तयार केल्याचे सांगितले होते.