अंजनगावात स्किल इंडियाचा लोगो वापरून बोगस भरती?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:40 AM2024-09-10T11:40:44+5:302024-09-10T11:42:19+5:30
Amravati : पोलिसांकडून दोघांची चौकशी, उगाचच झंझट नको म्हणून फिर्यादीने परत घेतली लेखी तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : स्थानिक श्रीनाथ विद्यालयात सोमवारी दुपारी सुरक्षा कर्मचारी व सुपरवायझर भरतीच्या नावाखाली बोलाविलेल्या शेकडो युवकांकडून शंभर रुपये प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या नदीम आणि शिवनाथ या दोघांची स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. मात्र, या प्रकरणाची पोलिसांत लेखी तक्रार करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्याने ती तक्रार मागे घेतल्याने वादावर पडदा पडला.
तक्रारीनुसार ९ ते १२ सप्टेंबरदरम्यान कॅपिटल सिक्युरिटी संकेतस्थळाच्या नावाने कोणताही पत्ता न देता सुरक्षा जवानांच्या भरतीची जाहिरात स्थानिक मीडियात झळकली. भारत कौशल्य विकास योजना असे नाव या जाहिराती दिली. भरतीत सहभागी होणाऱ्या तरुण, तरुणींना नाशिक पोलिस दलात नोकरी देण्याची बतावणी करण्यात आली.
याबाबत प्रशासनाला कुठलीही माहिती नाही. आयोजक बेरोजगार युवकांकडून गेटवरच शंभर रुपये व नोंदणी फी साडेतीनशे रुपये वसूल करीत होते आणि त्यांना शिस्तीसाठी छडीचे फटकेसुद्धा मारीत होते. आलेल्या बहुतांश युवकांना या आयोजकांनी घेतलेली रक्कम तक्रारीनंतर पोलिस स्टेशन आवारात परत केली. यावरून ही भरतीप्रक्रिया केवळ बनाव असून, युवकांकडून पैसे उकळण्यासाठी राबविण्याचा आरोप करण्यात आला. मात्र त्यानंतर तक्रारकर्ता पदाधिकारी बॅकफूटवर आल्याने मुसळ केरात गेले.