स्थायी समितीत बोगस बियाणे गाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:00:50+5:30
पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आदी ठिकाणी बोलगार्ड-३ बीटी बियाणे पकडले आहे. या बनावट बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच आता पेरणीच्या तयारीला वेग येत असताना, धामणगाव रेल्वे तालुक्यात बनावट बीटी कपाशी बियाणे विकले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉफरन्सिंगद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात शुक्रवारी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य सुहासिनी ढेपे, अभिजित बोके, सुनील डिके, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, कॅफो दत्तात्रय फिसके आदी सभागृहात उपस्थित होते.
पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. खरिपाला सुरुवात होत नाही तोच बाजारपेठेत बोगस बियाण्याचा शिरकाव झाल्याचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये धामणगाव तालुक्यात कृषी व पोलीस विभागाने देवगाव फाटा, तळणी, निंभारी, दत्तापूर आदी ठिकाणी बोलगार्ड-३ बीटी बियाणे पकडले आहे. या बनावट बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडून यावर कृषी विभागाकडून काय उपाययोजना केल्यात, याची जाब सदस्य सुनील डिके यांनी कृषी अधिकाऱ्यांना विचारला. यासोबतच सोयाबीन बियाणे, सिंगल सुपर फॉस्फेट या खतांच्या किमतीत तफावत येत आहे. हा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी उपस्थित केला. कृषिसेवा केंद्रांमध्ये बियाण्यांचे दरपत्रक, स्टॉकची नोंद, विक्री केलेल्या मालाची पावती आदींची तपासणी कृषी विभागाकडून होत नसल्याचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, या सर्व मुद्द्यांवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषिविकास अधिकारी यांना बोगस बियाणे धामणगाव तालुक्यात पकडण्यात आले असल्याचे सभागृहात सांगितले. खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होवू नये, किमतीही नियंत्रणात राहाव्यात, यासाठी कृषी विभागाने या प्रकारांना आळा घालावा, अशा सूचना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केल्या. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी व त्याची पावती घ्यावी, असे आवाहन कृषी सभापती विठ्ठल चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी केले. सभेत इतर मुद्यांवरही चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले.
बांधकाम, पशुसंवर्धनचे विषयही चर्चेत
परतवाडा-अकोला या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी चिखलदरा तालुक्यातील बोराळा या गावाच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात गिट्टी, मुरुमाची वाहतुक सुरू आहे. यामुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. वाहतुकीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे संबंधिताकडून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सभापती दयाराम काळे यांनी केली. पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती मिळत नसल्याचे सदस्य महेंद्र गैलवार यांनी सांगितले. यापुढे योजना राबविताना सदस्यांना माहिती देण्याचे आदेश सभापती बबलू देशमुख यांनी दिले.