बोगस बियाणे उठले शेतकऱ्यांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:01:16+5:30
धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी तब्बल नऊ लाख रुपयांचे बनावट बियाणे गस्तीदरम्यान पकडले. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत. तालुक्याची स्थिती पाहता, पाच वर्षांपासून या तालुक्यात बोगस बियाण्याचा धंदा अधिक फोफावला आहे.
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : भरदार बियाणे, दमदार उत्पादन, त्यात इतर नामांकित कंपन्यांच्या भावापेक्षा किंमत कमी आणि हमखास पिकणार याची हमी देत तालुक्यात बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. दरवर्षी शेकडो एकर जमीन या बोगस बियाण्यांमुळे पडीक राहत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलीस व कृषी विभाग बोगस बियाण्यांच्या मुळाशी कधी पोहोचणार व शेतकºयांचे दरवर्षी जाणारे बळी कधी थांबणार, हा सवाल अनुत्तरित आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी तब्बल नऊ लाख रुपयांचे बनावट बियाणे गस्तीदरम्यान पकडले. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत. तालुक्याची स्थिती पाहता, पाच वर्षांपासून या तालुक्यात बोगस बियाण्याचा धंदा अधिक फोफावला आहे. बंद असलेल्या किंवा सरकारने ज्या कपाशी बियाण्यावर बंदी घातली, अशा कंपनीचे बियाणे तालुक्यात आणणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती कृषी विभागाला असूनही या गंभीर बाबीकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे दरवर्षी तालुक्यातील शेतकरी नामांकित कंपनीचे म्हणून हे बियाणे खरेदी करतात. मात्र, काही निरक्षर शेतकºयांना ही गंभीर असणारी बाब लक्षात येत नाही. ज्यावेळी शेतात हे कपाशीचे अथवा इतर व्हेरायटी बियाणे निघत नाही, त्यावेळी संबंधित शेतकरी कृषिसेवा केंद्र अथवा ज्यांच्याकडे परवाना नाही, अशा व्यक्तीकडून मीमांसा करतात. अधिक पाऊस झाला, पेरणी व्यवस्थित केली नाही म्हणून शेतातील बियाणे दडपले, तर कधी अल्प पावसामुळे शेतातील बियाणे निघाले नाही, असे शेतकºयांना पटवून दिले जाते. काही कृषिसेवा केंद्राचे संचालक शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतात. फसगत टाळण्यासाठी अशांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे तहसीलदार कांबळे म्हणाले.
नावापुरतेच केवळ भरारी पथक
धामणगाव तालुक्यात दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने भरारी पथकांची निर्मिती करण्यात येते. विशेष म्हणजे, पथकातील काही अधिकारी कृषिसेवा केंद्र संचालकांकडे एकट्याने जाऊन दुकानाची तपासणी करतात. संबंधित दुकानात केवळ रेट बोर्ड , स्टॉक रजिस्टर याची तपासणी होते. मात्र, संबंधित दुकानाच्या गोडाऊनमध्ये कोणता मालक किती, याची तपासणी केली जात नाही. जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राच्या तोंडावर एका कृषी अधिकाºयाने मंगरूळ दस्तगीर परिसरातील एका संचालकाकडे जाऊन ‘नियोजन’ व्यवस्थितपणे करून घेतले असल्याची चर्चा या परिसरात आहे.
विशिष्ट दुकानातून विक्री
धामणगाव तालुक्यात सोमवारी बोगस बियाणे पकडण्यात आले. असे बियाणे दरवर्षी तालुक्यात येते. त्याची पेरणी होते. पूर्वी ते विशिष्ट दुकानांमध्ये मिळायचे. आता तालुक्यातील लहान-मोठे गावांतही त्याचे लोण पसरले आहे गत हंगामात एचटीबीटीच्या नावाखाली अनेक शेतकºयांना बोगस बियाणे विकण्यात आले. पेरलेले न उगवल्याने ते देशोधडीला लागले आहेत.
पोलीस करणार पर्दाफाश
तब्बल नऊ लाखांचे बोगस बियाणेप्रकरणी चालकाला अटक झाली. बियाणे कुठून आणले, धामणगाव तालुक्यात कोणत्या कृषिसेवा केंद्राकडे हे बियाणे उतरणार होते, बोगस बियाणे बोलावणाºयांमध्ये कोण-कोण सहभागी आहे, कृषी विभागातील अधिकाºयांचा हात आहे का, याचा पोलीस विभाग तपास करीत आहे. बोगस बियाण्याचे रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याचे तळेगावचे ठाणेदार अशोक कांबळे यांनी सांगितले.
धामणगाव तालुक्यात केवळ कृषी विभागच नव्हे, तर आता महसूल विभागाचे संयुक्त भरारी पथक नियुक्त करण्यात येणार आहे. पथकातील अधिकारी स्वतंत्रपणे तपासणी करणार असेल, कारवाईचा प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविण्यात येईल
- भगवान कांबळे, तहसीलदार