जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान - ना. राम शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:11 PM2017-11-09T23:11:21+5:302017-11-09T23:11:35+5:30
अमरावती : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे.
अमरावती : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे. यंदा अपु-या पर्जन्यमानाची झळ कमी करण्यात योजनेतील कामे महत्त्वपूर्ण ठरली. हे अभियान यापुढेही अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी दिले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) व राजना-नेकनामपूर या गावांत जलयुक्त शिवार अभियानातील बंधा-यावर ना. शिंदे यांच्या हस्ते जलपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, उपविभागीय अधिकारी वनश्री लाभसेटवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रताप अडसड, धानो-याच्या सरपंच भारती नरसेकर, चंद्रमणी गजभिये यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
धानोरा येथील बंधा-याची साठवण क्षमता ८३ टीसीएम असून, त्याचा गावातील शेतीला मोठा लाभ होणार आहे. विहिरींचे पुनर्भरण होऊन पेयजलाची उपलब्धताही राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे देण्यात आली. कार्यक्रमाला विविध विभागांच्या अधिकारी- कर्मचा-यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.