दिवसा उकाडा, रात्री थंडी
By admin | Published: February 2, 2017 12:04 AM2017-02-02T00:04:26+5:302017-02-02T00:04:26+5:30
हिमालयात बर्फवृष्टी व पाऊस सुरूच राहणार असल्याने ५ फेबु्रवारीपर्यंत रात्री थंडी तर दिवसा उकाडा असे वातावरण अमरावतीकरांना सोसावे लागेल.
तापमान राहणार ‘जैसे थे’ : कमी दाबाची द्रोणीय स्थिती
संदीप मानकर अमरावती
हिमालयात बर्फवृष्टी व पाऊस सुरूच राहणार असल्याने ५ फेबु्रवारीपर्यंत रात्री थंडी तर दिवसा उकाडा असे वातावरण अमरावतीकरांना सोसावे लागेल. विदर्भात तीन दिवसांपूर्वी किमान तापमान सरासरीच्या आसपास म्हणजे ११ ते १३ अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, अलिकडे तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
पश्चिमी चक्रवात (गडबड) कमी दाबाच्या द्रोणीय स्थितीच्या स्वरुपात ३.१ कि.मी.उंचीवर जम्मू काश्मीरकडे सरकत आहे. याप्रभावामुळे इशान्य राजस्थानमध्ये ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. तसेच आसामवर १.५ किमी. उंचीवरही चक्राकार वारे वाहात आहेत. कोमोरिनलगतच्या दक्षीण तामिळ आणि केरळवर ९०० मीटर उंचीवर हवेच्यावरच्या थरात चक्राकार वारे असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ही दुहेरी स्थिती निर्माण झाल्याने रात्रीच्या किमान तापमानात तीन दिवसांत विशेष फरक पडणार नाही. हिमालयातील बर्फवृष्टीमुळे रात्री थंडीचा जोर कायम राहणार आहे. दिवसा नागरिकांना काही प्रमाणात उकाडा सहन करावा लागणार आहे. अमरावतीचे किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहिल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. सध्या पावसाची शक्यता नसून काही दिवस हवामान कोरडे राहण्याचे संकेत आहेत.
किमान तापमान आहे तसेच राहणार असून कमाल तापमानात थोडी वाढ होणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहणार आहे.
- अनिल बंड,
हवामानतज्ज्ञ अमरावती.