‘त्या’ विहिरीतून निघतेय चक्क उकळते पाणी! अमरावती जिल्ह्यातील बेनोडा येथील आश्चर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 08:30 AM2023-05-19T08:30:00+5:302023-05-19T08:30:02+5:30
Amravati News बेनोडा (शहीद) येथील स्थानिक रहिवासी हरिश्चंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील विहिरीला मागील चार दिवसांपासून अचानकपणे अतिशय गरम पाणी येत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमरावतीः बेनोडा (शहीद) येथील स्थानिक रहिवासी हरिश्चंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील विहिरीला मागील चार दिवसांपासून अचानकपणे अतिशय गरम पाणी येत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाच वर्षांपूर्वी खोदलेल्या विहिरीतील पाण्याचे तापमान आतापर्यंत सामान्य होते. घरकाम तसेच पेयजल म्हणूनसुद्धा हे पाणी वापरले जात होते. मात्र, चार दिवसांपासून अचानकपणे गरम पाणी येत असल्याने नागरिकांनी निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे. योगायोगाने विहिरीला लागूनच एक दरगाह असल्याने हा काहीतरी दैवी चमत्कार असल्याच्या अफवासुद्धा पसरायला लागल्या आहेत.
पाणी वापरण्यास मनाई
घटनेची माहिती मिळताच बेनोड्याचे सरपंच, उपसरपंच यांनी भेट देऊन महसूल विभागाला माहिती दिली. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून पाण्याचे नमुने भूगर्भशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठविले. अहवाल येईपर्यंत सदर विहिरीचे पाणी वापरण्यात मनाई केली आहे.
दोन-बादल्या सोडल्या
मोटरपंपाने खेचलेले पाणी गरम लागल्याने विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे वाघ कुटुंबीयांना समजले. ही वार्ता गावात व पंचक्रोशीत पसरताच भेट देणारा प्रत्येक जण त्यांच्या विहिरीत दोर-बादली सोडून पाण्याची चाचपणी करीत आहे. बादलीमध्ये विहिरीतून उकळते पाणी वर येत आहे.
भूगर्भातील जलप्रवाह दिशा बदलवित असताना ते गंधकाच्या साठ्याच्या संपर्कात आल्याने भूजलाचे तापमान वाढते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
- दीपक फरकाडे, भूगर्भशास्त्र अभ्यासक, बेनोडा