आगीत रूग्णवाहिका भस्मसात
By admin | Published: August 26, 2016 12:16 AM2016-08-26T00:16:11+5:302016-08-26T00:16:11+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभ्या असलेल्या १०८ रूग्णवाहिकेला अचानक आग लागली.
कुऱ्हा पोलीस ठाण्यांतील घटना : पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
कुऱ्हा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभ्या असलेल्या १०८ रूग्णवाहिकेला अचानक आग लागली. या आगीत ही रूग्णवाहिका भस्मसात झाली. ही घटना २५ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
एम.एच.१४-सी.एल.०५४७ क्रमांकाची १०८ रूग्णवाहिका स्थानिक पोलीस ठाण्यांत अत्यावश्यक सेवेसाठी उभी होती. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास या अॅम्ब्युलन्सला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. अॅम्ब्युलन्स शेजारी उभी अन्य वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापूर्वी पोलिसांनी तातडीने ती बाजूला केलीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अॅम्ब्युलन्समध्ये एसी असल्याने शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. धामणगाव व चांदूररेल्वे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेत रूग्णवाहिकेचे अंदाजे २५ ते ३० लाख रूपयांचे नुकसान झाले. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. (वार्ताहर)