बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:13 PM2019-02-27T23:13:55+5:302019-02-27T23:15:06+5:30
अतिसतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक- नाशक पथकाकडून बुधवारी शहरातील गर्दीच्या स्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अतिसतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक- नाशक पथकाकडून बुधवारी शहरातील गर्दीच्या स्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली.
सार्वत्रिक आणि गर्दीच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले होण्याचे संकेत गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत. त्यानुसार येथील बॉम्ब शोधक-नाशक पथकाने मंगळवारपासून गर्दीच्या ठिकाणाची सूक्ष्म तपासणी आरंभली आहे. बुधवारी डी-मार्ट, राजकमल चौक, बसस्थानक व जलशुद्धीकरण केंद्रांची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली.
दरम्यान, बेवारस वस्तू, साहित्य निदर्शनास येताच या पथकाकडून त्यांचीदेखील तपासणी करण्यात आली. मंदिर, मशीद, रेल्वे स्थानक, प्रमुख महत्त्वाची स्थळे, मध्यवर्ती कारागृह आदी जागांची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली जात आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने सतर्कता बाळगण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत.
नागरिकांनो, ही घ्या काळजी
बॉम्ब पेरून घातपाती कारावाया करण्याचे मनसुबे दहशतवादी संघटनांचे आहे. त्यामुळे बेवारस साहित्य किंवा वस्तू निदर्शनास आल्यास त्याला हात लावू नये. त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता पोलीस यंत्रणेला ही माहिती द्यावी. कुणी संशयास्पद अथवा अनोळखी दिसून आल्यास, त्याबाबत पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ नामशेष करण्यासाठी आवश्यक ते साहित्य, वस्तू आहेत. त्यानुसार गर्दीच्या स्थळाची नियमित तपासणी केली जात आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वच साहित्य उपलब्ध आहेत. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी.
- जयंत राऊत
पोलीस निरीक्षक, बीडीडीएस