बॉम्बचा थरार बंकरमध्ये राहणे, ‘रेडी टू इट’ जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 05:00 AM2022-02-26T05:00:00+5:302022-02-26T05:01:03+5:30

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातून दहा विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला.  वस्तुस्थिती जाणून घेतली.  रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये कोणी जिल्ह्यातील नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी केले आहे.

Bomb stay in bunker, ‘ready to eat’ meal | बॉम्बचा थरार बंकरमध्ये राहणे, ‘रेडी टू इट’ जेवण

बॉम्बचा थरार बंकरमध्ये राहणे, ‘रेडी टू इट’ जेवण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : थोड्या थोड्या वेळाने बॉम्बचा आवाज येतो. हॉस्टेलच्या खाली बंकर तयार करण्यात येऊन आम्हाला ठेवण्यात आले आहे. कुणाशीही फारसा संपर्क नाही, अधूनमधून मिल्ट्रीचे सैनिक येतात. काऊंटिंग करतात, आम्ही प्रचंड दहशतीत वावरत आहोत. आमच्या परतीसाठी प्रयत्न करा, अशी आर्जव मिळेल त्याला करतोय, ही आपबिती आहे युक्रेनमध्ये अडकलेल्या अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची... विशेष म्हणजे, युक्रेनमध्ये युद्धच सुरू झाल्याने रशिया सीमेवर आठ दिवसांपासून धुमश्चक्री सुरू आहे. फारसा गंभीर प्रकार नाही, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात आता आम्ही जीव मुठीत घेऊन आहोत, असेही ते सांगतात.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जिल्ह्यातून दहा विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला.  वस्तुस्थिती जाणून घेतली.  रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये कोणी जिल्ह्यातील नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी केले आहे.
त्यानंतर दहा विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी युक्रेनमधील आप्तांच्या रहिवासी पत्त्यासह फोन नंबरची माहिती आपत्ती निवारण कक्षाला दिली व या कक्षाने मंत्रालयातील राज्य आपत्ती निवारण कक्षाला व तेथून दूतावासाला देण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी सांगितले. 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील महसूल व पोलीस यंत्रणेद्वारा युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आल्याचे बिजवल म्हणाले. जिल्हा नियंत्रण कक्षात शुक्रवारी दिवसभरात आठ व सायंकाळनंतर दोन विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाली व यासंदर्भात राज्य नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले.

हे आहेत ते विद्यार्थी
अभिषेक बारब्दे, प्रणव फुसे, साहीर तेलंग, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, स्वारज पुंड, प्रणव भारसाकळे, कुणाल कावरे व नेहा लांडगे या विद्यार्थ्यांची नावे बारतील दूतावासाला सध्या कळविण्यात आलेली आहेत. यामध्ये काही नावे वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले. युक्रेनमध्ये धूमश्चक्री असली तरी रशियात सध्या विद्यार्थी सुरक्षित आहेत.

सैनिकांद्वारे बंकरमध्ये चौकशी
हॉस्टेलच्या खाली तात्पुरते बंकर तयार करण्यात आले आहे. येथे अधूनमधून युक्रेनची मिलिटरी येते. किती जण आहेत, याची माहिती घेते. फोटो काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा युद्धस्थितीत आम्ही या देशाची सीमा कशी ओलांडणार, असा प्रश्न विद्यार्थांना भेडसावत आहे. 

बाॅर्डर क्राॅस करून पोलंड, रुमालियास जाण्याच्या सूचना 
युक्रेनची राजधानी किवीपासून २०० किमी अंतरावरील व्हिनितसिया या शहरात राहणाऱ्या स्वराज पुंड या विद्यार्थ्याने सांगितले, बंकरमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्यातून सध्या बाहेर निघता येत नाही. भारतीय विद्यार्थ्यांसह अन्य देशातील नागरिकांना युक्रेनच्या सीमेपलीकडे असलेल्या पोलंड या देशात सीमा ओलांडून जाण्याच्या सूचना दूतावासाद्वारा देण्यात आलेल्या असल्याचेही स्वराज सांगतो.  

 

Web Title: Bomb stay in bunker, ‘ready to eat’ meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.