कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोजसाठी बोंबाबोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:00 AM2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:01:06+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी लाभार्थींची संख्यावाढ झाल्यामुळे आरोग्य विभागाद्वारे केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. अगदी गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक ती सुविधा देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाद्वारे १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, यापूर्वी ज्या नागरिकांनी पहिला डोज कोव्हॅक्सिनचा घेतला आहे, त्यांची विहित मुदत संपत असताना डोज उपलब्ध झालेला नसल्यामुळे सगळीकडे बोंबाबोंब सुरू झाली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी लाभार्थींची संख्यावाढ झाल्यामुळे आरोग्य विभागाद्वारे केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. अगदी गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू करण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी आवश्यक ती सुविधा देण्यात आली. त्यानंतर चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कॉमार्बिड रुग्णांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या प्रकारातील लसींचे डोज उपलब्ध करण्यात आले आहेत. सुरुवातीला कोव्हॅक्सिनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर मात्र कोविशिल्डचेच डोज उपलब्ध करण्यात आल्याने कोव्हॅक्सिनची बहुतांश केंद्रे बंद पडली व या केंद्रांवर कोविशिल्डचे डोज उपलब्ध करण्यात आले. मात्र, ज्या व्यक्तींनी पहिला डोज कोव्हॅक्सिनचा घेतलेला आहे, त्यांना चार ते पाच आठवड्यांत दुसरा डोज कोव्हॅक्सिनचा घेणे आवश्यक असताना, तो उपलब्ध नसल्याने आता ओरड सुरू झालेली आहे. आता २८ एप्रिलला शहरातील दोन-चार केंद्रांवर ही लस उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोविशिल्डने २,१८,१३४ नागरिकांचे लसीकरण
जिल्हा प्रशासनाचे माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे २,३२,९८० डोज उपलब्ध करण्यात आले. यामध्ये २,१८,१३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दिलेल्या उद्दिष्टाच्या ही टक्केवारी ४१ आहे. यामध्ये १,८४,०३१ व्यक्तींनी पहिला व ३४,१०३ व्यक्तींनी मंगळवारपर्यंत दुसरा डोज घेतला. सोमवारी पुन्हा २५ हजार डोज उफलब्ध करण्यात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
कोव्हॅक्सिनचे ५४,९२० डोज उपलब्ध
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यास कोव्हॅक्सिनचे ५४,९२० डोज उपलब्ध करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत ४७,६०३ नागरिकांचे लसीकरण झाले. पहिल्या टप्प्यात ४३,३२३ व दुसऱ्या टप्यात ४,२८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. अद्याप ३९,०४३ नागरिकांनी दुसरा डोज घ्यायचा असताना लसीचा पुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे.
कोव्हॅक्सिनच्या दोन लाख डोजची मागणी शासनाकडे केली आहे. त्याच्या तुलनेत सोमवारी पाच हजार डोज मिळाले आहेत. ज्यांनी पहिला डोज घेतला आहे, त्यांना दुसरा डोज मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी