बोंडे म्हणाले, यशोमती दलाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:27 AM2019-01-18T01:27:47+5:302019-01-18T01:29:33+5:30
काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या यशोमती ठाकूर या दलाल आहेत, चोर आहेत, असा सनसनाटी आरोप मोर्शीचे भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या यशोमती ठाकूर या दलाल आहेत, चोर आहेत, असा सनसनाटी आरोप मोर्शीचे भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केला. खोपडा गावातील पुनर्वसितांच्या भूसंपादनात असलेल्या घोटाळ्याची, अनियमिततेची आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराची प्रकरणे बुधवारी आमदार यशोमती ठाकूर यांनी उघडकीस आणल्यानंतर संतापलेल्या बोंडे यांनी हा आरोप केला.
खोपडा व बोडना पुनर्वसनातील नागरिकांनी आमदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात गुरूवारी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील खोपडा पुनर्वसनातील उर्वरित प्लॉटचे वाटप त्वरित करण्यात यावे. जानेवारीअखेरपर्यंत अवार्ड मिळावा, प्रकल्पग्रस्तांना घरकुलाचा त्वरित लाभ मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात.
निम्न चारघड प्रकल्पाला सन २००७ मध्ये सुरूवात झाली असताना हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. यामध्ये बुडीत क्षेत्रात असलेल्या खोपडा गावातील ४०० पैकी ३८० ग्रामस्थांना प्लॉटवाटप मंजूर आहे. मात्र, आमदार यशोमती ठाकूर यामध्ये राजकीय दबाव टाकून प्रक्रियेत हस्तक्षेप करीत आहेत. २०११ ते २०१५ या काळात प्रकल्प न होण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप आ. अनिल बोंडे यांनी केला.
खोपडा निम्न चारघड प्रकल्पात कलम १९ वर दुरूस्ती करिता १३९ प्रकल्पग्रस्तांनी अर्ज सादर केले. यात आ. ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर नागरिकांबाबत आक्षेप नोंदविला. २००७ नंतर काही घरे पडायला आलीत, त्या नागरिकांनी घरे दुरूस्ती केल्याने त्यांचे मूल्यांकन वाढले. आता त्यांना वाढीव मोबदला शासन देत आहे. यातही आ. यशोमती ठाकूर हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप आ. अनिल बोंडे यांनी केला. याबाबतच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख व विभागीय उपायुक्त (पुनर्वसन) प्रमोद देशमुख यांना दिले.
भाजपाच्या उमेदवाराला मत देण्यासाठीही घेतली दलाली
'आ. यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाने क्वात्रोची मामा यांच्यापासून दलाली खाल्ली. एवढच नव्हे तर यशोमती ठाकूर यांनी मोझरी विकास आराखड्यात दलाली खाल्ली. भाजपाच्या उमेदवाराला मत देण्यासाठीही यांनी दलाली खाल्ली. बोडणा, खोपड्यात उन्हाळ्यापूर्वीच घरे बांधायची आहे. पावसाळ्यात या सर्व घरांत पाणी शिरते, तेव्हा वाचवायला यशोमती ठाकूर येणार आहेत काय,' असा सवाल आ. अनिल बोंडे यांनी केला. या काँगे्रसवाल्यांना कुणाच्या मरणाची चिंता नाही. दलाली खायला मिळाली नाही तर इथे येतात, दादागिरी करतात. आम्ही आता कुणाचीही दादागिरी सहन करणार नाही, हे दाखवायलाच या माता-भगिनींसह येथे आलो असल्याचे आ. बोंडे म्हणाले.
कुरवाडे मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी करा
खोपडा येथे २२ एप्रिल २०१५ रोजी निवडणुकीच्या वादात दिलीप राजाराम कुरवाडे या युवकाची हत्या झाली. यामध्ये काही आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, प्रकरणातील काही आरोपी अद्यापही मोकळे आहे व त्यांना आ. ठाकूर संरक्षण देत असल्याचा आरोप आ. बोंडे यांनी अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार यांच्याशी बोलताना केला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन सीआयडी चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांना घरकुलाचा लाभ मिळावा
खोपडा येथील नागरिकांची २३५ घरकुले मंजूर आहेत. मात्र, बुडीत क्षेत्रात असल्याने ती रखडलेली आहेत. याबाबत डीआरडीएची बैठक बोलावून नागरिकांना रमाई आवास, शबरी आवास व पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा, घर बांधायला किमान एक लाख ६५ हजारांचा अवार्ड मिळावा, खोपडा ब बोडना येथील नागरिकांना सन २००९ च्या सुधारीत जीआरप्रमाणे वाढीव मोबदला मिळावा, प्लिंथसाठी वाढीव मोबदला मिळण्याची मागणी आ. बोंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.