उद्यापासून मेळघाटात घुंगरू बाजाराची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:50 AM2017-10-21T00:50:03+5:302017-10-21T00:50:14+5:30
दिवाळीनंतर शुक्रवारी गोवर्धन पूजा केल्यानंतर शनिवार, २१ आॅक्टोबरपासून मेळघाटातील प्रत्येक आठवडी बाजाराला ‘घुंगरू बाजाराचे’ स्वरूप लाभणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : दिवाळीनंतर शुक्रवारी गोवर्धन पूजा केल्यानंतर शनिवार, २१ आॅक्टोबरपासून मेळघाटातील प्रत्येक आठवडी बाजाराला ‘घुंगरू बाजाराचे’ स्वरूप लाभणार आहे. मेळघाटातील दºयाखोºयांत वास्तव्य करणाºया आदिवासी गोंड बांधवांसाठी घुंगरू बाजाराचे विशेष महत्त्व आहे.
मेळघाटातील कोरकू बांधव ज्याप्रमाणे होळीनंतरच्या सहा दिवसांत ‘फगवा’ उत्सव साजरा करतात, त्याचप्रमाणे गोंड समाजाचे बांधवांसाठी दिवाळी ही उत्सवाची पर्वणी राहते. ‘घुंगरू बाजार’ यालाच ठाट्या बाजार म्हणूनही संबोधण्यात येते. दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर दुसºया दिवशी जनावरांची गावपूजा असते. गावाबाहेर गाय, म्हैस व इतर गोधन एका ठिकाणी जमा केले जाते. यावेळी सर्वांना रंगरोगन करून सजविण्यात येते. तेथे फटाक्यांची आतषबाजी होते.
गोवर्धन किंवा गावपूजा झाल्यावर गोंडी बांधव नवीन कपडे परिधान करून तालुक्यात येणाºया प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन गोंडी नृत्य सादर करतात. याप्रसंगी गोंड बांधवांचा विशेष पेहराव असतो. यात पांढरा शर्ट, पांढरे धोतर, शर्टवर काळा कोट किंवा जॅकेट, डोळ्यावर काळा चष्मा, डोक्यावर धुर्रेदार पगडी, हातात बासरी व कवळ्यांची माळ्यांची लटकन घालून बहारदार गोंडी नृत्य सादर करण्यात येते. वाजंत्रीच्या साधनात ढोलक, मातीची बनविलेली टिमकी, आणि म्हशीच्या शिंगाची लांबलचक पुंगी यांचे विशेष आकर्षण असते. शनिवार २१ आॅक्टोबरला कळमखार, रविवार २२ ला चाकर्दा, सोमवार २३ ला वैरागड व बिजुधावडी, मंगळवार २४ ला टिटंबा, बुधवार २५ ला हरिसाल, गुरुवार २६ ला सुसर्दा आणि शुक्रवार २७ २२ आॅक्टोबरला धारणीत घुंगरू बाजाराची विशेष मेजवानी पर्यटकांना भुरळ घालणारी ठरणार आहे.