प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ सुविधेसह मूलभूत सुविधांचा बूस्टर! निम्न पेढी प्रकल्प
By प्रदीप भाकरे | Published: February 26, 2024 09:56 PM2024-02-26T21:56:38+5:302024-02-26T21:56:57+5:30
पाच पुनर्वसित गावात बाजार ओटे अन् अंगणवाडी बांधकाम
प्रदीप भाकरे, अमरावती: भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पबाधितांची पुनर्वसन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्णत: बुडीत पाचही गावातील लोक हळूहळू मूळ गाव सोडून पुनर्वसन स्थळी येऊ लागले आहेत. त्याअनुषंगाने प्रकल्पबाधितांना ‘रेडी टू लिव्ह’ मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच पाचही पुनर्वसित गावात बाजार ओटे, अंगणवाडी व स्मशान शेडसाठी संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी ३ कोटी रुपये खर्चिले जाणार आहेत.
निंभास्थित पेढी नदीवर निम्न पेढी सिंचन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पामुळे कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, अळणगाव, हातुर्णा व गोपगव्हान ही पाच गावे पूर्णता बाधित झाली आहेत. त्यामुळे त्या पाचही गावांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पाचे बांधकाम ९० टक्क्यांवर थांबल्याने व अद्यापही घळभरणी न झाल्याने बाधित कुटुंबांची पुनर्वसनस्थळी घरे बांधण्यास मर्यादा आली आहे. मात्र ते यावेत, यासाठी आता सुमारे तीन कोटींमधून पाचही पुनर्वसित क्षेत्रात बाजार ओटे व अन्य सुविधा साकारल्या जाणार आहेत.
बाजार ओटा अन् स्मशानशेडला आवारभिंत
हातुर्णा येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन मौजा रायपूर पांढरी येथे झाले आहे. तेथे ७३.३१ लाख रुपये खर्चून सिमांकन नाली व रस्ता ओलांडण्याकरिता स्लॅबचे बांधकाम सुरू होणार आहे. तेथेच ४१.९८ लाख रुपये खर्चून स्मशान शेडसाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे, तर २७.८५ लाख रुपये खर्चून पांढरी रायपूर या पुनर्वसन स्थळी २७.८५ लाख रुपये बाजार ओटा बांधला जाणार आहे. गोपगव्हान येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन लोणटेक येथे करण्यात आले. तेथे ३६.५९ लाख रुपये खर्चून संरक्षणभिंत व १५.९१ लाख रुपयांतून बाजार ओटा साकारला जाईल.
///////
कुंड खुर्द, सर्जापूर, अळणगावातही बांधकाम
कुंडखुर्द (कठोरा) येथे ३१.५७ लाखांतून स्मशानशेडसाठी संरक्षण भिंत, तर २६.६० लाख रुपयांतून अंगणवाडी इमारत, तर १९.८७ लाख रुपयांमधून बाजार ओट्याचे बांधकाम होईल. कुंडसर्जापूर येथे २०.६६ लाखांतून, तर अळणगावकरांसाठी पुनर्वसित कठोरा येथे २७.८३ लाख रुपये खर्चून बाजार ओटा साकारला जाणार आहे.
////
कुणाचे पुनर्वसन कोठे?
मूळ गाव : पुनर्वसन ठिकाण
अळणगाव : कठोरा
कुंड खुर्द : कठोरा
गोपगव्हान : लोणटेक
कुंड सर्जापूर : कुंड सर्जापूर रोड
हातुर्णा : पांढरी रायपूर
////////
कोट
निम्न पेढी प्रकल्पातील प्रकल्पबाधित कुटुंब पुनर्वसन स्थळी घरे बांधू लागली आहेत. पुनर्वसन ठिकाणी ३ कोटी रुपयांतून बाजार ओटे, अंगणवाडी व स्मशानशेडला संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहेत.
गणेश कथले, कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग