बेशुद्धावस्थेत सापडलेला बालक निघाला बल्लारशाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:18 PM2018-05-04T23:18:39+5:302018-05-04T23:18:39+5:30
चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले. आयुष अनिल रोहिदास (४, रा. बल्लारशा) असे त्या बालकाचे नाव आहे.
चांदूर रेल्वे येथील रेल्वे स्थानकावर आढळून आलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला जीआरपी पोलिसांनी इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी दखल घेतली. गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आ. सुनील देशमुख यांनीही विविध स्तरावर प्रयत्न केले. दरम्यान, एका कुटुंबीयांनी बल्लारशा पोलिसांकडे बालक बेपत्ता असल्यासंदर्भात धाव घेतली. पोलिसांनी कुटुंबीयांना जखमी बालकाचे छायाचित्र दाखविताच ओळख पटली. ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ अमरावतीकडे धाव घेतली. दोन दिवसांनंतर कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल असलेला आयुष दिसताच त्यांचे अश्रू अनावर झाले. तथापि, पोलिसांनी आयुष रेल्वे स्थानकावर कसा पडला, याबाबत माहिती विचारली असता, त्याचा घटनाक्रम न पटण्यासारखाच होता. आयुषचे मोठे वडील अशोक रोहिदास १ मे रोजी आयुष व त्यांचा मुलगा आझादला फिरायला घेऊन गेले. त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर पोहोचले. डोंगरगड जाण्याचा बेत आखून ते बम्बलेश्वरी देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यांना तेथून बल्लारशाला परत यायचे होते, मात्र, रेल्वे गाडी नसल्यामुळे ते स्थानकावरच झोपले. २ मे रोजी अशोक हे दोन्ही मुलांना घेऊन एका रेल्वेत बसले. चांदूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर आपण चुकीच्या रेल्वेत बसल्याचे त्यांना समजले. ते रेल्वेतून आली उतरले आणि बल्लारशा रेल्वेची प्रतीक्षा करू लागले. काही तासानंतर बल्लारशा जाणारी रेल्वे आली. अशोक रोहिदास दोन्ही मुलांना घेऊन चढत असताना आयुष खाली पडला आणि रेल्वे पुढे निघून गेली. अशोक एका पायाने अंपग असल्यामुळे रेल्वेतून उतरून आयुषला उचलणे त्यांना शक्य झाले नाही. ही बाब जीआरपी पोलिसांच्या चौकशीत पुढे आली.
मुलाची छायाचित्रे व्हाटसअॅपद्वारे सगळीकडे पाठविण्यात आली होती. त्या मुलाची बल्लारशा येथील आयुष रोहिदास अशी ओळख पटली. त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.
- राजेंद्र नागरे, पोलीस उपनिरीक्षक, जीआरपी.