...अन् 'त्याने' प्रेयसीवर चढविला चाकूने हल्ला, देवरणकरनगरमधील खळबळजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 14:07 IST2022-10-31T14:04:46+5:302022-10-31T14:07:40+5:30
सहकारीही गंभीर जखमी

...अन् 'त्याने' प्रेयसीवर चढविला चाकूने हल्ला, देवरणकरनगरमधील खळबळजनक घटना
अमरावती : खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या एका तरुणीसह तिच्या कार्यालयीन सहकाऱ्याला एका तरुणाने चाकूने भोसकले. यात ती तरुणी व तिचा सहकारी तरुण गंभीर जखमी झाला. प्रेयसी तिच्या काही मित्रांसह रात्री एक वाजता पार्टीतून आली तसेच ती कॉल रिसिव्ह करीत नसल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने ते कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
ही घटना देवरणकरनगरमध्ये २८ ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री १२.४० च्या सुमारास घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी राहुल (रा. अर्जुननगर, अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी तरुणी शहरातच एका खासगी बँकेत नोकरी करते. ‘मंथ एन्ड’ पार्टी करण्यासाठी ती ऑफिसमधील मित्र मैत्रिणींसोबत शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये गेली होती. दुसरीकडे शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहुल तिला भेटण्यासाठी गेला होता.
ती साईनगर भागात भाड्याने खोली करून राहते. त्याने तरुणीला वारंवार कॉल केले, मात्र तिने कॉल रिसिव्ह केले नाहीत. मैत्रिण कम प्रेयसी पार्टीसाठी गेली आहे. त्यामुळे ज्या मित्रांसोबत गेली, त्यापैकी एक देवरणकरनगर भागातील असल्याचे त्याला माहिती झाले. त्यामुळे तो देवरणकरनगर भागात येऊन तरुणीची प्रतीक्षा करीत थांबला होता. रात्री पाऊण ते एक वाजेच्या सुमारास तरुणी तिच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचली.
यावेळी तू कॉल रिसिव्ह का करत नाही, कारमधील हे सर्व कोण आहेत, अशी शंका उपस्थित करून त्याने वाद घातला. याचवेळी तरुणीचा एक ऑफिस सहकारी जो पार्टीसाठी तिच्यासोबत होता, तो कारमधून खाली उतरला. राहुलने त्याच्या पोटात चाकूने घाव घातला. याचवेळी तरुणी मधात आली तर तिच्याही मांडीत त्याने चाकू मारला. ही माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तू प्रेमात धोका दिला, तुला जिवानेच मारतो, असे म्हणून आरोपी राहुलने त्याची कथित प्रेयसी व पुरुष सहकाऱ्याला जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली.