बीपीएल लाभार्थींची साखर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:29 PM2017-09-18T22:29:44+5:302017-09-18T22:30:27+5:30
शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी.....
जितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रेशनकार्डधारकांची साखर बंद करून फक्त अंत्योदय कार्डधारकांनाच साखर देण्याचा निर्णय १५ सप्टेंबर रोजी घेतला असला तरी जिल्ह्यात जुलै महिन्यापासूनच साखर मिळणे बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ८०६ इतक्या जुन्या बीपीएल कार्डधारकांना रेशनमधून मिळणारी साखर बंद झाली आहे. आता फक्त १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांनाच प्रतिकुटूंब एक किलो साखर दिली जात आहे. हे प्रमाण पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम होते.
शासकीय धोरणानुसार मे महिन्यापर्यंत बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर १३ रूपये ५० पैशांना मिळत होती तर सणासुदीला हे प्रमाण ६६० ग्रॅम इतके होते. परंतु केंद्र सरकारने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान देण्याचे कळविले होते. त्यानुसार मे २०१७ मध्ये राज्य शासनाने आदेश काढून सर्व जिल्ह्यांना या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे बजावले. जून महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलो इतकी साखर २० रूपये दराने विक्री करण्यात आली.
परंतु जुलैपासून शासनाने बीपीएलधारकांना साखरविक्री बंद करून अंत्योदय कार्डधारकांनाच साखरेची विक्री सुरू केली आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ३७२ अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलोप्रमाणे साखर रेशनवर दिली जात आहे. शुक्रवार १५ सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅमप्रमाणे दिली जाणारी साखर आता प्रतिकुटुंब एक किलोनुसार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अर्ध्याहून अधिक प्रमाण घटले
प्रत्येक कुटुंबात सरासरी चार माणसे गृहित धरल्यास पूर्वी प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम प्रमाणे दोन किलो साखर अंत्योदय कार्डधारकांना मिळत होती परंतु शासनाने साखरेचे प्रमाण कमी केल्याने कुटुंबाला एक किलोच साखर मिळत आहे. एका कुटुंबात सहा सदस्य असले तरी त्यांना एक किलो साखरेवरच समाधान मानावे लागत आहे.
जूनमध्ये बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलोप्रमाणे साखरेचे वितरण करण्यात आले. जुलैपासून केवळ अंत्योदय कार्डधारकांना एक किलो याप्रमाणे साखरेचे वाटप केले जात आहे.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी