ब्रॅन्ड अॅम्बेसेडर देणार स्वच्छतेचा कानमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:39 PM2017-10-24T23:39:41+5:302017-10-24T23:39:53+5:30
महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ चे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर भारत गणेशपुरे बुधवारी अमरावतीकरांना स्वच्छतेचा कानमंत्र देणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ चे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर भारत गणेशपुरे बुधवारी अमरावतीकरांना स्वच्छतेचा कानमंत्र देणार आहेत. खासगी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने राज्याच्या घराघरांत पोहचलेले अमरावतीकर भारत गणेशपुरे यांची महापालिकेने ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. त्यांच्या उपस्थितीत बुधवार २५ आॅक्टोबरला टाऊन हॉल येथे स्वच्छतेच्या अनुषंगाने महापालिकेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जानेवारी २०१८ मध्ये अमरावती शहराला ‘स्वच्छ सर्वेक्षण- २०१८’ या केंद्रस्तरावरील ‘स्वच्छ शहर ’स्पर्धेला सामोरे जायचे आहे. यंदा झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात शहर २३३ क्रमांकापर्यंत घसरले होते. ती नामुष्की शहरावर पुन्हा येऊ नये, यासाठी महापालिकेने ‘स्वच्छ अमरावती’चा संकल्प सोडला आहे. अल्प मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामग्रीमुळे महापालिकेच्या प्रयत्नांना मर्यादा आली आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेला लोकसहभागाचे बळ आवश्यक आहे. त्यापार्श्वभूमिवर अमरावतीकर जनतेला आपलेसा वाटणारा चेहरा भारत गणेशपुरे यांच्या रुपाने महापालिकेने शोधला आहे. गणेशपुरे यांनी महापालिकेचा प्रस्ताव स्वीकारला असून ते बुधवारी दुपारी ४ वाजच्याच्या सुमारास शहर स्वच्छतेबाबत अमरावतीकरांशी संवाद साधणार आहेत.
घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, प्लास्टिकबंदी व स्वच्छताविषयक उपक्रमातील जनजागृती मोहिमेत गणेशपुरे यांची छवी वापरली जाणार आहे.
देशातील ५०० शहरांतून स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक पटकावणाºया इंदोर शहराने त्यांच्या यशाचे संपूर्ण गमक जागरूक लोकसहभागात असल्याचे पुरस्कार स्वीकारताना म्हटले होते. लोकसहभागाचा तोच कित्ता अमरावती महापालिका गिरवणार आहे. गणेशपुरेही त्या मोहिमेत सक्रिय राहतील. शहर स्वच्छतेत लोकसहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण दिंडी
२५ आॅक्टोबरला दुपारी दिडच्या सुमारास गणेशपुरे महापालिका सभागृहात पदाधिकारी व अधिकाºयांशी संवाद साधतिल. त्यानंतर दुपारी ३.४५ च्या सुमारास स्वच्छ सर्वेक्षण दिंडी काढली जाणार आहे. दुपारी ४ वाजता होणाºया मुख्य कार्यक्रमाला सेंद्रिय शेतीचे संशोधक सुभाष पाळेकर यांच्यासह स्थानिक आमदार ,महापालिकेचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गट, एमआयडीसी असोशिएशन, आयएमए , स्त्री वैद्यकीय संघटना , लॉयन्स क्लबच्या प्रतिनिधींसह हॉटेल्स, मंगल कार्यालयधारकांना निमंत्रित करण्यात आले आहे.